मुंबई : सोने वितळवून त्याची पेस्ट विदेशातून आणलेल्या भारतीय प्रवाशाकडून ६७० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. त्याची बाजारभावानुसार किंमत सुमारे २३ लाख आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ)ने ही कारवाई केली.विमानतळावरील प्रवाशाच्या साहित्यात रविवारी सकाळी साडेदहा वाजता आक्षेपार्ह वस्तू दिसल्याने, सीआयएसएफच्या जवानांनी अधिक तपासणी केल्यावर त्यामध्ये सोने वितळवून त्याची पेस्ट तयार केल्याचे आढळून आले. या प्रकरणी मुबशीर कोलकरण या आरोपीला सोन्याच्या पेस्टसह अटक करण्यात आली. आरोपी दुबईहून एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आला होता व स्पाईसजेटच्या विमानाने कोइम्बतूरला जाण्याच्या तयारीत होता. या सोन्याबाबत आरोपी कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकला नाही व सोन्याच्या खरेदीबाबत त्याच्याकडे कोणतेही देयक अथवा योग्य कागदपत्र मिळाले नाही, त्यामुळे आरोपीला सीआयएसएफने ताब्यात घेतले व पुढील कारवाईसाठी त्याला सीमाशुल्क विभागाच्या ताब्यात दिले.या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. जप्त केलेल्या सोन्याचे वजन ६७० ग्रॅम असून, त्याची किंमत २३ लाख १५ हजार ५२० रुपये आहे.
मुंबई विमानतळावर २३ लाखांचे सोने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 5:57 AM