मुंबई विमानतळ वक्तशीरपणात अव्वल; दिल्लीसह बंगळुरूलाही टाकले मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 08:08 AM2021-06-20T08:08:08+5:302021-06-20T08:08:28+5:30

एका धावपट्टीवर विमानाची आगमन वा प्रस्थान प्रक्रिया सुरू असताना दुसरी धावपट्टी बंद ठेवावी लागत असल्याने पीक अवरमध्ये मुंबई विमानतळाचे वेळापत्रक कोलमडते.

Mumbai Airport tops in punctuality; He left Delhi and Bangalore behind | मुंबई विमानतळ वक्तशीरपणात अव्वल; दिल्लीसह बंगळुरूलाही टाकले मागे

मुंबई विमानतळ वक्तशीरपणात अव्वल; दिल्लीसह बंगळुरूलाही टाकले मागे

googlenewsNext

मुंबई : वक्तशीरपणात मुंबईविमानतळ अव्वल ठरले आहे. जवळपास ९८ टक्के उड्डाणे वेळेत पूर्ण करीत मुंबईने दिल्ली आणि बंगळुरूलाही मागे टाकले आहे. देशातील सर्वात व्यस्त विमानतळांच्या यादीत मुंबईचा वरचा नंबर लागतो. शेकडो विमानांची ये-जा आणि प्रवाशांच्या वर्दळीमुळे दिवसभर हा परिसर गजबजलेला असतो. मुंबई विमानतळावर दोन धावपट्ट्या असल्या तरी त्या एकमेकांना छेदत असल्याने विमान संचलनावर त्याचा परिणाम होतो. म्हणजे समांतर धावपट्ट्या असलेल्या इतर विमानतळांप्रमाणे येथून एका वेळी दोन विमानांचे उड्डाण करता येत नाही.

एका धावपट्टीवर विमानाची आगमन वा प्रस्थान प्रक्रिया सुरू असताना दुसरी धावपट्टी बंद ठेवावी लागत असल्याने पीक अवरमध्ये मुंबई विमानतळाचे वेळापत्रक कोलमडते. मात्र, या अडथळ्यांवर मात करीत मुंबई विमानतळाने वक्तशीरपणात अव्वल क्रमांक पटकावला आहे. ‘एटीसी’ टॉवरमधील कर्मचाऱ्यांच्या समयसूचकतेमुळे हे साध्य झाले आहे.देशांतर्गत सेवा देणाऱ्या सहा आघाडीच्या विमान कंपन्यांच्या मे महिन्याच्या वेळापत्रकाचा अभ्यास करून नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डिजीसीए) आकडेवारी सादर केली.

दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबाद या विमानतळांवरील उड्डाणांचा तुलनात्मक अभ्यास त्यात करण्यात आला आहे. त्यानुसार सहापैकी चार कंपन्यांनी मुंबई विमानतळाला वक्तशीरपणात पहिला क्रमांक दिला आहे. मुंबई विमानतळावर मे महिन्यात एअर एशिया आणि विस्ताराच्या विमानांचे वेळापत्रक १०० टक्के अचूकरीत्या पाळले. तर इंडिगो ९९.३० टक्के, गो एअर ९४.२० टक्के, स्पाईस जेट ९५.८० टक्के आणि एअर इंडियाच्या विमानांनी ९५.७० टक्के अचूकता साधली.

प्रतिदिन किती विमाने आकाशात झेपावतात?

कोरोनापूर्वी मुंबई विमानतळावरून प्रतिदिन सरासरी ९७० विमाने ये-जा करायची. कोरोनामुळे प्रवासी संख्या कमी झाल्याने उड्डाणांवरही परिणाम झाला आहे. सध्या येथील उड्डाणसंख्या २५०वर स्थिरावली आहे.

Web Title: Mumbai Airport tops in punctuality; He left Delhi and Bangalore behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.