लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना निर्बंधात शिथिलता दिल्यापासून हवाई वाहतूक क्षेत्राला गतिमानता प्राप्त झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई विमानतळावर विमानांची वर्दळ वाढली असून, जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये विमानोड्डाणात २३.९७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रकोपामुळे मुंबई विमानतळावरील उड्डाणसंख्येत घट झाली. मे महिन्यात येथून केवळ ७,१४७ विमानांनी ये- जा केली होती. त्यात १,९६९ आंतरराष्ट्रीय आणि ५,१७८ देशांतर्गत विमानांचा समावेश होता. जून महिन्यात विमानोड्डाणात काहीशी वाढ नोंदवण्यात आली. जूनमध्ये मुंबईहून ८,२५८ विमानांनी उड्डाण घेतले, तर जुलै महिन्यात ११,४६० विमानोड्डाणांची नोंद झाली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होताच मुंबईसह देशभरात निर्बंधात शिथिलता देण्यात आली. त्याचा फायदा हवाई वाहतूक क्षेत्राला झाला. ऑगस्टमध्ये विमानोड्डाणात सुमारे २४ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. या काळात मुंबई विमानतळावरून १४,२०८ विमानांनी ये-जा केली. त्यात २,५६४ आंतरराष्ट्रीय आणि १४,२०८ देशांतर्गत विमानांचा समावेश होता.
सप्टेंबर महिना हा सणासुदीचा काळ असल्यामुळे प्रवासी संख्येत मोठी वाढ दिसून आली. त्यामुळे या महिन्यात विमानोड्डाणांत ३० ते ३५ टक्क्यांची वाढ अपेक्षित असल्याचे हवाई वाहतूकतज्ज्ञांनी सांगितले. दरम्यान, देशभरातील विमानतळांवरून होणाऱ्या विमान उड्डाणांची स्थितीही सुधारत असून, गेल्या काही दिवसांत त्यात ३५ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवण्यात आली आहे. मे महिन्यात देशभरातून आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत मार्गावर ७४ हजार ७२७ विमानांनी ये- जा केली. जूनमध्ये ८१ हजार ४१५, जुलै १ लाख १४ हजार ६८८ आणि ऑगस्ट महिन्यात विमानोड्डाणांची संख्या १ लाख ३७ हजार ८७६ इतकी नोंदविण्यात आली.
......
ऑगस्टमधील विमानोड्डाणाची स्थिती
विमानतळ देशांतर्गत आंतरराष्ट्रीय
दिल्ली... २०,८३७ ... ४,१३७
मुंबई... १४,२०८ ... २,५६४
बंगळुरू... १०,७२२ ... १,३२८