मुंबई विमानतळ ठरले सर्वोत्तम; एसीआयकडून गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 10:20 AM2024-03-13T10:20:14+5:302024-03-13T10:21:55+5:30
अद्ययावत तंत्राद्वारे पाच कोटींपेक्षा जास्त प्रवाशांची उत्तम हाताळणी.
मुंबई : वर्षाकाठी पाच कोटींपेक्षा जास्त प्रवासी संख्या हाताळत नवा विक्रम रचणाऱ्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आशिया-पॅसिफिक विभागातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून गौरविण्यात आले आहे.
एअरपोर्टस् कौन्सिल इंटरनॅशनल (एसीआय) या आंतरराष्ट्रीय संस्थेने सर्वोत्तम विमानतळ म्हणून मुंबई विमानतळाची निवड केली आहे. विशेष म्हणजे, सलग सातव्यांदा मुंबई विमानतळाला हा सन्मान जाहीर झाला आहे. मुंबई विमानतळाने अलीकडेच १४/३२ या धावपट्टीचे रि-कारपेटिंग केले. ज्यामुळे मुंबईची विमानतळाची धावपट्टी अधिक सुरक्षित झाली आहे, तर आंतरराष्ट्रीय प्रवासी, देशांतर्गत प्रवासी यांना जोडणी करणाऱ्या हस्तांतरण विभागातही सुलभता आणली आहे. ज्यामुळे प्रवाशांना होणारा विलंब टळत आहे.
बार-कोडिंग तंत्रज्ञानाचा वापर -
१) परिणामी, अधिक प्रवासी हाताळण्याची क्षमता वाढीस लागली आहे.
२) याखेरीज विमानतळ परिसरात येणाऱ्या वाहनांची कोंडी होऊ नये व सुलभतेने प्रवास व्हावा, याकरिता बार-कोडिंग तंत्रज्ञानाचादेखील वापर केला आहे.
३) अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत विमानतळ अधिक सुसज्ज करण्याच्या अभिनव उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार जाहीर झाला आहे.