Mumbai Water Cut: देशातील सर्वांत मोठा विमानतळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा (सीएसएमआयए)चा पाणीपुरवठा बुधवारी (५ फेब्रुवारी) आणि गुरुवारी (६ फेब्रुवारी) पूर्णत: बंद राहणार असल्याची माहिती मुंबई महापालिका प्रशासनाने दिली.
विमानतळाचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पालिका प्रशासनाने विमानतळ प्रशासनाला पूर्वकल्पना दिली आहे.
नवी २४०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यासाठी बुधवारी (दि. ५ फेब्रुवारी २०२५) सकाळी ११ ते गुरुवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत, ३० तासांच्या कालावधीत एस, एल, के पूर्व, एच पूर्व आणि जी उत्तर विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
यात के पूर्व विभागातील आंतरराष्ट्रीय विमानतळ व सिप्झ-मुलगाव डोंगरी, एम.आय.डी.सी., मार्ग क्रमांक १ ते २३ या प्रमुख विभागांचाही समावेश आहे. ट्रान्स अपार्टमेंट, कोंडीविटा, महेश्वरी नगर, उपाध्याय नगर, ठाकूर चाळ, साळवे नगर, भवानी नगर, दुर्गापाडा, मामा गॅरेज या विभागातही ५ आणि ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.