मुंबई - मे ते जुलै या तीन महिन्यांच्या काळात हज यात्रेसाठी सुमारे ६५ हजार प्रवाशांची हाताळणी मुंबईविमानतळ प्रशासन करणार आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हज यात्रेच्या प्रवाशांच्या हाताळणीमध्ये २०२३ या वर्षाच्या तुलनेत २०२४ या वर्षातील ही सर्वाधिक संख्या असून गेल्यावर्षीच्या तुलनेत ही प्रवासी वाढ तब्बल १५७ टक्के इतकी अधिक आहे.
२५ मे पासून हज यात्रेसाठी प्रवासी रवाना होण्यास सुरुवात झाली आहे. विक्रमी संख्येने हज प्रवास होत असल्यामुळे तेथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी विविध विमान कंपन्यांनी एकूण १०१ अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन केले आहे. सुमारे ३३ हजार प्रवासी मुंबईतून हज यात्रेसाठी रवाना होणार असून तेवढेच प्रवासी परत मुंबईत दाखल होणार आहेत. दरम्यान, प्रवाशांच्या हाताळणीसाठी विमानतळावर विशेष चेक-इन काऊंटरची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.