मुंबई : मुंबई विमानतळ केरळच्या सांस्कृतिक सौंदर्याचा वेध घेणार आहे. येथील ‘जय हे’ संग्रहालयातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या कार्निव्हलसाठी यंदा केरळची निवड करण्यात आली आहे.
मुंबई विमानतळाच्या कार्निव्हलचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १८ जूनपर्यंत हा कार्यक्रम दूरचित्रसंवाद माध्यमातून पार पडेल. ‘अघोषम २०२१’ असे या महोत्सवाचे नाव असून, मल्याळम या भाषेत त्याचा अर्थ उत्सव असा होतो. केरळचे सामाजिक-सांस्कृतिक अंग, कला, पर्यटन आणि इतिहासाचा वेध घेण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जाणार आहे. देशभरातील नागरिकांना घरबसल्या या कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे. १२ ते १४ वयोगटातील पालिका शाळेच्या २०० विद्यार्थ्यांना यात सहभागी करून घेतले जाणार आहे. चर्चासत्रे, कथा-कविता वाचन, छायाचित्रांचे प्रदर्शन अशा विविध कार्यक्रमांचा आस्वाद यानिमित्ताने घेता येईल.