मुंबई विमानतळाचे डाेमेस्टिक टर्मिनल उद्यापासून खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:07 AM2021-03-09T04:07:50+5:302021-03-09T04:07:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (मुंबई) टर्मिनल-१ तब्बल एका वर्षांनंतर बुधवार, १० मार्चपासून खुले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (मुंबई) टर्मिनल-१ तब्बल एका वर्षांनंतर बुधवार, १० मार्चपासून खुले होईल. गेल्या मार्च महिन्यात लॉकडाऊन लागू केल्यानंतर प्रवाशांची संख्या कमी झाल्याने टर्मिनल-१ म्हणजे डाेमेस्टिक टर्मिनलवरील विमान वाहतूक टर्मिनल-२वर वळविण्यात आली होती. मार्च २०२० पासून टर्मिनल-२वरूनच देशांतर्गत आणि आंतराष्ट्रीय विमान उड्डाणे होत होती.
१० मार्च रोजी टर्मिनल-१ वरून १०२ विमानफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात मुंबई विमानतळावरून उड्डाण होणाऱ्या ५१, तर देशातील विविध २७ ठिकाणांहून मुंबईत पोहोचणाऱ्या ५१ विमानांचा समावेश आहे. प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी ३८ चेक-इन काउंटर्सची व्यवस्था केली आहे. त्याचप्रमाणे ८ स्वयंसेवा केंद्रांचीही उभारणी केली आहे. त्याचप्रमाणे विमातळ कर्मचाऱ्यांशी प्रवाशांचा कमीत कमी संपर्क येईल, अशी व्यवस्था करण्यात आल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले.
विमान प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांकडे कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल (७२ तासांकरिता वैध) असणे बंधनकारक आहे. एखाद्या प्रवाशाकडे असा अहवाल नसल्यास टर्मिनल-१ वर त्याची कोरोना चाचणी करण्यात येईल. त्यासाठी ८५० रुपये शुल्क आकारण्यात येईल.
* १० मार्चसाठी वाहतुकीचे नियोजन
५१ - उड्डाणे
५१ - विमानांचे आगमन
एकूण - १०२
----------------