Join us

मुंबईत मद्यतस्करी वाढली!

By admin | Published: January 21, 2015 1:07 AM

गेल्या काही महिन्यांत मुंबईतील मद्यतस्करीत वाढ झाल्याची माहिती निदर्शनास आली आहे.

चेतन ननावरे - मुंबईगेल्या काही महिन्यांत मुंबईतील मद्यतस्करीत वाढ झाल्याची माहिती निदर्शनास आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत सुमारे अडीच कोटी रुपयांहून अधिक मद्यसाठा जप्त करण्यात आला असून, सुमारे २ हजारांहून अधिक आरोपींना प्रशासनाने अटक करीत गुन्हे दाखल केले आहे.दीव, दमण, गोवा या भागांतून मोठ्या प्रमाणात उत्पादन शुल्क चुकवत मद्यसाठा आणण्याचे प्रकार सर्रासपणे घडत असतात. अशा करचुकव्या मद्यविक्रेत्यांवर प्रशासनाचे भरारी पथक स्थानिक निरीक्षकांच्या मदतीने कारवाई करीत असते. त्यासाठी वेळोवेळी शहरासह उपनगरांत नाकाबंदीही लावण्यात येते. मात्र अनेक वेळा चोरट्या मार्गाने तस्करी करण्याचे प्रकार घडतच असतात.दरम्यान, एप्रिल ते डिसेंबर २०१४ दरम्यान प्रशासनाने केलेल्या कारवाईत वाढ झाल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे. सध्या राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे मुंबईतील देशी, विदेशी आणि गावठी मद्यावर देखरेख ठेवण्यासाठी शहर आणि उपनगर अशा दोन अधीक्षकांच्या नियंत्रणाखाली विशेष यंत्रणा काम करीत आहे. त्यात काळा गूळ, गावठी दारू, रसायन, देशी मद्य, विदेशी मद्य, बनावट स्कॉच, परराज्यातून येणारे मद्य, ताडी, स्पिरिट अशा विविध प्रकारांवर यंत्रणेचे लक्ष असते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भरारी पथके स्थानिक निरीक्षकांच्या मदतीने कारवाईही करतात. सध्या शहरात आणि उपनगरांत प्रत्येकी दोन भरारी पथके कार्यरत आहेत.यासंदर्भात अधिक माहिती देताना शहर जिल्हा अधीक्षक आर.सी. परमार म्हणाले, ‘मुंबई शहरात गावठी दारू तयार केली जात नाही; तर ठाणे जिल्ह्यातून त्याची तस्करी केली जाते. त्यामुळे रेल्वेमार्ग आणि रस्तेमार्गावर यंत्रणेचे नेहमीच बारीक लक्ष असते. शिवाय शहरातील खासगी पार्ट्यांमध्ये बनावट स्कॉच विक्री करण्याची अधिक प्रकरणे समोर येतात. त्यामुळे साध्या वेशातील अधिकारी नेहमीच अशा पार्ट्यांमध्ये पुरवण्यात येणाऱ्या मद्यसाठ्यावर लक्ष ठेवून असतात.’मुंबई पूर्व व पश्चिम उपनगरांत उत्पादन शुल्क बुडवणाऱ्या मद्यविक्रेत्यांवर सतत कारवाई सुरू असल्याची माहिती उपनगर अधीक्षक सुभाष बोडके यांनी दिली. २०१३ सालच्या तुलनेत २०१४ साली मद्यासंदर्भातील कारवाईच्या प्रकरणांत वाढ झाल्याचेही त्यांनी सांगितले. एप्रिल ते डिसेंबर २०१४ दरम्यान प्रशासनाने उपनगरांत विविध प्रकरणांत १ हजार ९१९ गुन्ह्यांची नोंद केली आहे. २०१३ साली ही संख्या १ हजार ७०५ इतकी होती.