Join us

मुंबई अलर्ट! १३ धोकादायक पुलांवर जास्तवेळ न थांबण्याची सूचना व आवाहन

By सचिन लुंगसे | Published: August 29, 2022 11:11 PM

१३ धोकादायक पुलांमध्ये मध्य रेल्वेवरील ४, तर पश्चिम रेल्वेवरील ९ पुलांचा समावेश

मुंबई : श्री गणेशोत्सवाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील सर्व गणेश भक्तांना व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सूचित करण्यात येते की, ‘मध्य रेल्वे लाईन’ वरुन जाणारे ४ पूल आणि ‘पश्चिम रेल्वे लाईन’ वरुन जाणारे ९ पूल हे अतिशय जुने झाल्याने धोकादायक स्वरुपाचे झालेले आहेत. तसेच, या १३ पुलांपैकी काही पुलांची दुरुस्तीची कामे सुरु आहेत किंवा पावसाळ्यानंतर सुरु करण्यात येणार आहेत. तरी सर्व श्रीगणेश भक्तांना सूचना व आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी श्रीगणेश आगमन आणि विसर्जनासाठी पुलावरुन जाताना ध्वनिक्षेपकाचा वापर करु नये तसेच नाच-गाणी इत्यादी बाबी टाळाव्यात. त्याचबरोबर पुलावर अधिक वेळ न थांबता पुलांवरुन त्वरित पुढे जावे. 

या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई वाहतूक पोलिस यांच्याद्वारे देण्यात येणा-या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख अभियंता (पूल) यांच्याद्वारे कळविण्यात आले आहे. 

बृहन्मुंबई महानगरपालिका पालिका हद्दीतील ‘मध्य रेल्वे लाईन’ वरुन जाणा-या ४ पुलांमध्ये घाटकोपर रेल ओव्हर ब्रिज, करीरोड रेल ओव्हर ब्रिज, साने गुरुजी मार्ग (आर्थर रोड) रेल ओव्हर ब्रिज, भायखळा रेल ओव्हर ब्रिज या पुलांचा समावेश आहे. तर, ‘पश्चिम रेल्वे लाईन’ वरुन जाणा-या ९ पुलांमध्ये मरिन लाईन्स रेल ओव्हर ब्रिज, ग्रँटरोड व मुंबई सेंट्रलच्या दरम्यान असणारा फॉकलंड रेल ओव्हर ब्रिज, मुंबई सेंट्रलच्या जवळ असणारा बेलासिस पूल, महालक्ष्मी स्टील रेल ओव्हर ब्रिज, प्रभादेवी कॅरोल रेल ओव्हर ब्रिज, दादर टिळक रेल ओव्हर ब्रिज यांच्यासह ग्रँटरोड व चर्नीरोडच्या दरम्यान असणारे सँडहर्स्ट रोड रेल ओव्हर ब्रिज, फ्रेंच रेल ओव्हर ब्रिज आणि केनडी रेल ओव्हर ब्रिज या पुलांचा समावेश आहे.

करीरोड रेल ओव्हर ब्रिज, साने गुरुजी मार्ग (आर्थर रोड) रेल ओव्हर ब्रिज किंवा चिंचपोकळी रेल ओव्हर ब्रिज आणि भायखळा रेल ओव्हर ब्रिज या पुलांवर एकावेळेस १६ टनांपेक्षा अधिक वजन होणार नाही, याची काळजी घेण्याचेही आवाहन करण्यात येत आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील श्रीगणेश भक्तांना विशेष सूचना देण्यात येते की, ‘मध्य रेल्वे लाईन’ वरील चिंचपोकळी रेल ओव्हर ब्रिज (आर्थर रोड) आणि करीरोड रेल ओव्हर ब्रिज पार करताना बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलिस यांच्याद्वारे देण्यात आलेल्या व वेळोवेळी देण्यात येणा-या सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन सहकार्य करण्याची विनंती देखील करण्यात येत आहे. 

टॅग्स :मुंबईरेल्वे