मुंबई ऑल आउट ऑपरेशन; सहा हजार वाहनांची झाडाझडती, १३० ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 10:18 PM2023-04-19T22:18:42+5:302023-04-19T22:19:33+5:30
मंगळवारी रात्री ११ वाजल्यापासून रात्री दोन वाजेपर्यंत राबविण्यात आलेल्या आँपरेशन आँल आऊट दरम्यान पोलिसांनी शहरातील ३९८ संवेदनशील ठिकाणांची तपासणी केली.
मुंबई: मुंबईतपोलिसांनी राबविलेल्या आँपरेशन आँल आऊट अंतर्गत शहरातील ७६ ठिकाणी नाकाबंदी करुन एकूण ६ हजार १५९ वाहनांची तपासणी केली. यातील २ हजार ८७२ वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई केली आहे. तर, १७ वाहन चालकांवर ड्रंक अँन्ड ड्राईव्ह अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
मंगळवारी रात्री ११ वाजल्यापासून रात्री दोन वाजेपर्यंत राबविण्यात आलेल्या आँपरेशन आँल आऊट दरम्यान पोलिसांनी शहरातील ३९८ संवेदनशील ठिकाणांची तपासणी केली. सोबतच पोलिसांनी १३० ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन केले. यात पोलीस अभिलेखावरील ९६० गुन्हेगारांची तपासणी करुन ३० आरोपींची धरपकड करत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या नेतृत्वात शहरातील पाच प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त तसेच विशेष शाखेचे अपर पोलीस आयुक्त, १३ परिमंडळाचे उपायुक्त, विशेष शाखा आणि सुरक्षा विभागाचे उपायुक्त, ३१ विभागीय सहायक आयुक्त, ९३ पोलीस ठाण्याचे वपोनि, पोलीस अधिकारी व अंमलदार या आँपरेशन आँल आऊटमध्ये सहभागी झाले होते.
यामध्ये अजामीनपात्र वाँरंट बजावलेल्या ८१ आणि अवैधरीत्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी २३ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याजवळून चाकू, तलवारी अशी घातक हत्यारे जप्त केली आहेत. शहरातून तडिपार करण्यात आलेल्या ३२ आरोपींवर मपोका कायद्याच्या कलम १४२ अन्वये तर, रात्रीच्या वेळी गुन्हा करण्यासाठी अस्तित्व लपवून फिरत असलेल्या ८७ आरोपींवर महाराष्ट्र (मुंबई) पोलीस कायद्याच्या कलम १२०, १२२आणि १३५ चा भंग केल्याप्रकरणी गुन्हे नोंदवत, कारवाई केली आहे. शहरात चालणाऱ्या दारु विक्री, जुगार अशा अवैध धंदे चालणाऱ्या ५१ ठिकाणी छापेमारी करुन ६२ आरोपींवर अटकेची कारवाई केली आहे. तसेच, अंमली पदार्थ कायद्यानव्ये १३५ जणांवर कारवाई करत पोलिसांनी अंमली पदार्थ जप्त केले आहेत.
५४२ अस्थापनांची झाडाझडती
शहरात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या हेतूने पोलिसांनी शहरातील हाँटेल्स, लाँज, मुसाफिरखाने अशा ५४२ अस्थापनांची झाडाझडती घेतली.