Mumbai: कांजूरमार्गमधील १५ हेक्टर जागेवरून आरोप-प्रत्यारोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 08:10 AM2023-04-16T08:10:58+5:302023-04-16T08:11:23+5:30
Mumbai: कांजूरमार्गच्या ४४ हेक्टरपैकी मेट्रो ६ साठी दिलेली १५ हेक्टर जागा कोणाची आहे, उर्वरित जागा कोणत्या बिल्डरच्या घशात घालणार आहात, असे सवाल युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले आहेत.
मुंबई : कांजूरमार्गच्या ४४ हेक्टरपैकी मेट्रो ६ साठी दिलेली १५ हेक्टर जागा कोणाची आहे, उर्वरित जागा कोणत्या बिल्डरच्या घशात घालणार आहात, असे सवाल युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले आहेत. हा एक मोठा घोटाळा असल्याचा आरोप करून त्यांनी मविआ सरकारच्या काळात कांजूरमार्गला कारशेड करण्याचा निर्णय झाला, तेव्हा त्या जागेवर केंद्र सरकारसह अनेक खासगी व्यक्तींनी दावा सांगितला होता. मग, आता हे सर्व दावे करणारे कसे बाजूला झाले, अशी शंकाही उपस्थित केली.
महसूल विभागाकडून मेट्रो ६ कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जागेचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर आरेची कारशेड कांजूरमार्ग येथील ४४ हेक्टर जागेत हलवली होती. या जागेत मेट्रो ३,६,१४ आणि ४ या चार लाइन्सचे कार डेपो एकत्र आणले जाणार होते. त्यामधून जनतेचे आणि महाराष्ट्राचे पैसा, वेळ वाचावेत हाच यामागचा हेतू होता. या चार डेपोमुळे साधारणपणे महाराष्ट्राचे साडेदहा हजार कोटी वाचवले असते, असे आदित्य ठाकरे म्हणाले. या चारही लाइन्स एकत्र कांजूरमार्ग येथे आल्या असत्या तर नोडलपॉइंट कांजूरमार्ग झाले असते. यामधून साडेचार कोटी जनतेला एका नोडल पॉइंटमधून आपण जोडलो गेलो असतो व मल्टिमॉडेल ट्रान्सपोर्टचा पर्याय दिला असता. सगळ्या गाड्या देखभालीसाठी एकाच ठिकाणी आल्या असत्या, असेही आदित्य म्हणाले.
आता मुख्यमंत्र्यांनी आम्ही निवडलेली कांजूरमार्गची जागा निवडली आहे. आता सर्वोच्च न्यायालया तील खटले मागे घेण्यात आले. ४४ हेक्टरपैकी १५ हेक्टरवर कारशेड होणार आहे. मग ही जमीन कोणाच्या मालकीची आहे? बाकी जमीन कोणत्या बिल्डरांना देणार आहात, हे जाहीर करावे.
- आदित्य ठाकरे, आमदार
‘ती भूमिका तुमच्या सरकारची होती’
मुंबई : मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार म्हणाले की, आदित्य ठाकरे अभ्यास करून बोलतील अशी अपेक्षा होती. पण त्यांचे बोलणे ऐकल्यावर त्यांना प्राथमिक शाळेत परत पाठवावे लागेल, असे दिसते. मेट्रो ३, ६ आणि १० यांचे एकत्रित कारशेड असावे, ही भूमिका आदित्य ठाकरे तुमच्या सरकारची होती. यासाठी तुमच्या पिताश्रींनी एक समिती नेमली. त्याचे सौनिक समिती असे नाव होते. त्या समितीचा अहवाल स्पष्टपणे सांगत होता की, मेट्रो तीनचे कारशेड आरेमध्येच करणे सोयीस्कर आहे. हा अहवाल तुमच्या पिताश्रींनी नेमलेल्या समितीचाच आहे. आरेमध्ये कारशेड केलेला खर्च पाण्यात घालून कांजूरमार्गमध्ये सर्वांचे कारशेड बांधण्याचा खर्च वेगळा करावा लागला असता. यात अक्कल आणि शहाणपणा कुठे आहे?
कुठल्याही प्रकल्पासाठी शासकीय आणि आर्थिक पातळीवर परवडतील असे निर्णय घ्यायचे असतात. जागा मिळाली तिथे कारशेड करा, हे धोरण अहंकारी असे आहे. आज आरेचे कारशेड पूर्ण झाल्यामुळे आज वर्षाअखेरीस मिळणारी मेट्रो ठाकरेंच्या अहंकारामुळे मिळालीच नसती. ठाकरे पिता-पुत्रांच्या अहंकारामुळे दररोज साडे पाच कोटींचे नुकसान मागच्या अडीच वर्षांपासून होते आहे. हा दररोजचा साडेपाच कोटींचा तोटा ठाकरे पिता-पुत्र कोणत्या कोषातून देणार आहेत. याचे उत्तर त्यांनी द्यावे.
मेट्रो ६ साठी १५ एकरच्या बाबतीत आताच्या सरकारने घेतलेली भूमिका व्यवहार्यता तपासून घेतलेली आहे. मेट्रो ३ चे काम पूर्ण होऊन अन्य कामाला
मदत करणारी आहे. दररोजचा साडे पाच कोटींचा तोटा भरून काढणारी आहे.
- आशिष शेलार,
अध्यक्ष, मुंबई भाजप.