मुंबईलाही दुष्काळाच्या झळा, भीमनगरमध्ये पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 05:03 AM2019-05-12T05:03:58+5:302019-05-12T05:04:08+5:30

मेगासिटीशी तुलना होत असलेल्या मुंबईतल्या एखाद्या परिसरात, एखाद्या भागात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे, असे सांगितले, तर विश्वास बसणार नाही.

Mumbai also faces drought, water distribution in Bhimnagar | मुंबईलाही दुष्काळाच्या झळा, भीमनगरमध्ये पाण्यासाठी वणवण

मुंबईलाही दुष्काळाच्या झळा, भीमनगरमध्ये पाण्यासाठी वणवण

Next

- सचिन लुंगसे

मुंबई : मेगासिटीशी तुलना होत असलेल्या मुंबईतल्या एखाद्या परिसरात, एखाद्या भागात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे, असे सांगितले, तर विश्वास बसणार नाही. मात्र, हे खरे आहे. कारण मुंबईच्या वेशीवर वसलेल्या मानखुर्द येथील महाराष्ट्रनगर आणि भीमनगरमधील रहिवाशांना पाण्यासाठी दुष्काळापेक्षाही भयंकर परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्रनगरमध्ये मध्यरात्री पाणीपुरवठा होत असून, भीमनगरमधील रहिवासी तर पूर्णत: पाण्यापासून वंचित आहेत़ महत्त्वाचे म्हणजे, गेल्या कित्येक वर्षांपासून भीमनगरमधील रहिवाशांना पाणी विकत घ्यावे लागत आहे़ महापालिकेने या प्रकरणी काहीच कार्यवाही केलेली नाही.
मानखुर्द रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला हाकेच्या अंतरावर महाराष्ट्रनगर आहे आणि त्याला जोडून भीमनगर. महाराष्ट्रनगरचा विचार करता, येथे मध्यरात्री अडीच वाजता पाणी येते. सकाळी साडेसहा ते सात वाजेपर्यंत पाणी राहते. महाराष्ट्रनगरमध्ये सुमारे एक हजार घरे आहेत. मात्र, या सर्व घरांना पुरेसे पाणी मिळत नाही. यापैकी अनेक घरांना चित्ता कॅम्पसह लगतच्या परिसरातून पाणी विकत घ्यावे लागते. दररोज ३५ लीटरचे पाच गॅलन लागतात. एका गॅलनची किंमत पाच ते दहा रुपये आहे. महिनाकाठी किमान पाचशेहून अधिक रुपये पाण्यासाठी खर्ची करावे लागतात.
महाराष्ट्रनगरला लागून असलेल्या भीमनगरची अवस्था तर याहून वाईट आहे. भीमनगरमध्ये सुमारे ८०० घरे आहेत. एका घरात चार व्यक्ती पकडल्या, तरी येथील लोकसंख्या ३,२०० हून अधिक होते. महत्त्वाचे म्हणजे येथील एकाही घराला महापालिकेकडून पिण्याचे पाणी पुरविले जात नाही. येथील प्रत्येक घराला पाणी विकत घ्यावे लागते. येथील महिला आणि लहान मुलांनासह कर्त्या पुरुषाला पाण्यासाठी चित्ता कॅम्प आणि लगतचा परिसर गाठावा लागतो. येथे पाण्यासाठी एका गॅलनामागे पाच ते दहा रुपये मोजावे लागतात. असे किमान पाच गॅलन दिवसाकाठी लागतात. महिन्याला पाचशे रुपयांहून अधिक रक्कम पाण्यावर खर्च केली जाते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, महाराष्ट्रनगर आणि भीमनगरमधील रहिवाशांना पिण्याचे पाणी मिळावे, म्हणून पाणी हक्क समितीचे कार्यकर्ते येथे काम करत आहेत. त्यांच्या सोबतीला येथील समाजसेवकही काम करत आहेत. भीमनगरला पाणी मिळावे, म्हणून २००८ सालापासून येथील समाजसेवक महापालिकेसोबत संवाद साधत आहेत, परंतु विविध कारणे देत महापालिकेने येथील नागरिकांना पाणी नाकारले आहे. येथील महापालिकेच्या एम/पूर्व विभाग कार्यालयावर रहिवाशांनी कित्येक वेळा मोर्चे काढले. पाण्यासाठी आंदोलने केली. मात्र, महापालिका काहीच हालचाल करत नाही. परिणामी, रहिवासी मेटाकुटीला आले आहेत. लोकसभा निवडणुका असोत वा यापूर्वी झालेल्या नगरसेवक पदासह विधानसभा निवडणुका असोत. येथे मत मागण्यासाठी उमेदवार येतो. पाणी देण्याचे वचन देतो. मात्र, पाणी काही मिळत नाही, अशी खंत रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

महिला वर्ग कंटाळला
दिवसाच्या २४ तासांपैकी अर्धाधिक वेळ हा पाणी भरण्यात जातो. जे पाणी मिळते, तेदेखील शुद्ध नसते. लहान मुलांचा अर्धा वेळ पाणी भरण्यात खर्ची होतो. महत्त्वाचे म्हणजे कधी-कधी विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागते, अशी माहिती येथील महिला वर्गाने दिली. लोकप्रतिनिधी येथे येतात. लोकांशी संवाद साधतात. मुलांशी संवाद साधतात, पण पाण्याचा प्रश्न काही मिटलेला नाही़

आरोग्य धोक्यात
पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते. मात्र, तेही व्यवस्थित नसते. आंघोळीसह उर्वरित कामाकरिता लागणारे पाणी येथील छोट्या विहिरीतून उपसले जात. मात्र, ते अशुद्ध असते. या कारणात्सव आरोग्याचा प्रश्न कायमच भेडसावतो.

पाण्याची चोरी करावी लागते
महापालिकेकडे पाणी मागून मिळत नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून पाण्यासाठी आंदोलन सुरू आहे. येथे समाजसेवक जर पाण्यासाठी वाद घालू लागले, तर त्यांच्यावर पाणी माफियाचा आरोप लावला जातो. त्यांना त्रास दिला जातो. अशा वेळी पाणी मागून मिळत नसेल, तर पाण्याची चोरी करण्याशिवाय पर्याय नसतो, असे रहिवाशांनी सांगितले.

२००८ सालापासून आंदोलने छेडली आहेत. महापालिका दाद देत नाही. नळासाठी आॅफलाइन अर्ज केला तर आॅनलाइन अर्ज करा, असे सांगितले जाते. आॅनलाइन अर्ज केला, तर दोन वर्षे झाली अद्याप जलजोडणी मिळालेली नाही. मग अशा वेळेला लोकांना पाणी विकत घ्यावे लागते. पाण्याची चोरी करावे लागते. यास जबाबदार कोण? याचे उत्तर सीस्टिमने द्यावे.
- अबरार सलमानी

पाणी हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मागेल त्याला पाणी मिळाले पाहिजे. पाणीवाटपात दुजाभाव करता कामा नये. मात्र, प्रशासन वेळकाढूपणा धोरण आखते आहे. येथील रहिवाशांना पाणी मिळावे, म्हणून आंदोलन केले आहे. मोर्चे काढले आहेत. परिणामी, प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि रहिवाशांना पाणी द्यावे.
- विशाल जाधव,
कार्यकर्ता, पाणी हक्क समिती

Web Title: Mumbai also faces drought, water distribution in Bhimnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई