Join us

Mumbai: विमानाच्या ‘टेल स्ट्राईक’ घटनेच्या चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2023 1:49 PM

Mumbai: धावपट्टीवर विमान उतरतेवेळी विमानाची शेपटी जमिनीला घासली गेल्याप्रकरणी (टेल स्ट्राईक) इंडिगो कंपनीने चौकशी करावी, असे निर्देश नागरी विमान महासंचालनालयाने कंपनीला दिले आहेत.

मुंबई : धावपट्टीवर विमान उतरतेवेळी विमानाची शेपटी जमिनीला घासली गेल्याप्रकरणी (टेल स्ट्राईक) इंडिगो कंपनीने चौकशी करावी, असे निर्देश नागरी विमान महासंचालनालयाने कंपनीला दिले आहेत. गेल्या तीन महिन्यांत तीन वेळा कंपनीच्या विमानांची शेपटी धावपट्टीला घासली गेल्याची माहिती आहे. अशा प्रकारांमुळे अपघात होण्याची शक्यता असते, त्या पार्श्वभूमीवर हे चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, २ फेब्रुवारी आणि १४ एप्रिल रोजी दोन वेळा अशा एकूण तीन वेळा इंडिगोच्या विमानाचे टेल स्ट्राईक झाल्याचे समजते. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ दोनच घटनांचा तपशील उपलब्ध आहे. यानुसार, पहिली घटना २ फेब्रुवारीला कोलकाता विमानतळावर उतरताना झाली होती, तर दुसरी घटना १४ एप्रिलला मुंबईहून नागपूर येथे गेलेल्या कंपनीच्या ६ ई-२०३ या विमानामध्ये झाली. नागपूर धावपट्टीवर उतरताना या विमानाची शेपटी जमिनीला घासली गेली होती. त्यानंतर ते विमान नागपुरातच देखभालीसाठी ठेवण्यात आले होते. या दोन्ही घटनांमध्ये सुदैवाने प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नव्हती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर डीजीसीएने कंपनीला विमानांची योग्य ती देखभाल करण्याचे निर्देश देतानाच कर्मचाऱ्यांना या संदर्भात योग्य ते प्रशिक्षण देण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या विमानांसंदर्भात ही घटना घडली त्या पायलट तसेच संबंधित कर्मचाऱ्यांचे विमान उड्डाण तूर्तास बंद करण्यात आल्याचे वृत्त असून त्यांना योग्य ते प्रशिक्षण देऊन मगच पुन्हा उड्डाणाची अनुमती देण्यात येणार असल्याचे समजते. तसेच, या टेल स्ट्राईकची माहिती सर्व वैमानिकांना देण्यात आली असून प्रशिक्षण संस्थेलादेखील या मुद्यावर विशेष लक्ष देण्याची सूचना करण्यात आली आहे.

टेल स्ट्राईक म्हणजे काय ?धावपट्टीवर उतरतेवेळी किंवा उड्डाण करतेवेळी विमानाची शेपटी किंवा शेवटाचा भाग जमिनीला घासणे याला विमान क्षेत्रामध्ये टेल स्ट्राईक असे संबोधले जाते.

टॅग्स :विमानमुंबई