‘वीकेण्ड’ सरींमध्ये मुंबईकर चिंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 02:57 AM2018-06-18T02:57:07+5:302018-06-18T02:57:07+5:30
सुटीच्या दिवशी पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने मुंबईकरांनी त्याचा मनमुराद आनंद लुटला. मुंबई शहर-उपनगरातील समुद्रकिनाऱ्यांवर पाऊस अंगावर घेत व लाटांचा मारा झेलत मुंबईकर प्रफुल्लित झाले.
मुंबई : सुटीच्या दिवशी पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने मुंबईकरांनी त्याचा मनमुराद आनंद लुटला. मुंबई शहर-उपनगरातील समुद्रकिनाऱ्यांवर पाऊस अंगावर घेत व लाटांचा मारा झेलत मुंबईकर प्रफुल्लित झाले. पावसात भिजण्याचा कंटाळा करणाºया अनेक मुंबईकरांनी दुपारी भजी, गप्पा आणि पावसात हिंडण्याचा बेत आखत सुट्टी एन्जॉय केली.
शहरातील परळ, एलफिन्स्टन, लालबाग, भायखळा आदी भागांमध्ये दुपारनंतर मुसळधार पाऊस कोसळला. मात्र, संध्याकाळी काही उंच लाटा असल्यामुळे तसेच याच कालावधीत मुसळधार पाऊस पडू लागल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु संध्याकाळी पाचनंतर पावसाने थोडी विश्रांती घेत रिमझिम सुरूच ठेवली होती. मात्र, पावसाच्या संततधारेमुळे तापमानात बदल होऊन हवेत गारवा पसरला होता. त्यामुळे मुंबईकर चांगलेच सुखावले होते. विशेषत: दक्षिण मुंबईमध्ये अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर कोंडी झाल्याचे चित्र होते. दरम्यान, सहा वाजता पुन्हा पावसाने आपला मारा सुरू केल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली.
पावसामुळे वातावरणात निर्माण झालेल्या गारव्यामुळे प्रत्येक ठिकाणी चहाच्या टपरीवर गर्दी दिसून येत होती. मोठ्या लाटांची भरती आणि पाऊस यामुळे संध्याकाळी वरळी, मरिन ड्राइव्ह, शिवाजी पार्कसह अनेक चौपाट्यांवर कॉलेज तरुण-तरुणींसह अनेक पर्यटक हजेरी लावत भिजण्याचा आनंद लुटताना दिसत होते. समुद्राला भरती असल्याने ठीकठिकाणी म्हणजे मरिन ड्राइव्ह तेगिरगावपर्यंत चौपाटीवर पोलीस तैनात करण्यात आले होते.
>बच्चेकंपनीने लुटला आनंद
शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाने वीकेण्ड मूड सेट केला होता. रविवारीही पावसाने मुंबईत हजेरी लावली. उकाड्याने हैराण झालेल्या बच्चेकंपनीने पावसात भिजण्याचा आनंद लुटला. भिजून आणि नाचून त्यांनी आनंद साजरा केला. दुपारी साडेतीन वाजता पावसाने हजेरी लावली. उकाड्याने हैराण झालेल्या मुलांना बाहेर पाऊस पडत असल्याने भिजण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी पावसात भिजून व आनंदाने नाचून पावसाचे जोरदार स्वागत केले.
>जोगेश्वरीत इमारतीची संरक्षक भिंत कोसळली
जोगेश्वरी येथील कॅप्टन सावंत मार्गावरील हिला पार्क इमारतीची संरक्षक भिंत कोसळून ६ कार आणि १ दुचाकीचे नुकसान झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. यामध्ये सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. काल सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे दोन इमारतींमध्ये असलेली ही संरक्षक भिंत कमकुवत झाली होती.
त्यामुळे रहिवाशांनी खबरदारीचा उपाय म्हणून या भिंतीजवळील भाग रिकामा केला होता. अखेर रात्री ही भिंत कोसळली
>सरींची शक्यता
शहर-उपनगरात थांबून थांबून पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर काही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस हजेरी लावेल, असेही म्हटले आहे. कोकण- गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भातही मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
>मान्सून पिकनिकचे जोरदार प्लान्स
दडी मारलेल्या पावसाने गेल्या आठवडाभरापासून मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि रायगड परिसरात जोरदार हजेरी लावायला सुरुवात केलीय. त्यामुळे झोपी गेलेले ट्रेकर्स आणि पिकनिकचे आयोजन करणारे मुंबईकरही खडबडून जागे झाले आहेत.
बºयाच मुंबईकरांनी पावसाचा मनमुराद आनंद लुटला असून बहुतेकांनी पुढील दिवसांत जोरदार नियोजन केले आहे. मुंबईसह नजीकच्या परिसरांत पावसाळ्यात गर्दी नसलेले ठिकाण शोधणे मुश्कीलच आहे.
शहराजवळ असलेले अनेक लहान-मोठे किल्ले, धबधबे, गुंफा, अभयारण्ये ही भटकंती करणाºयांसाठी पर्वणी ठरतात. त्यात आठवड्याभरात झालेल्या पावसाने गळ्यात कॅमेरा लटकवूून छायाचित्रे काढणाºया हौशानवशा छायाचित्रकारांसह गिरिमित्र, दुर्गप्रेमी आणि ट्रेकर्स यांना अनेक ठिकाणे खुणावू लागली आहेत