मुंबई : दोन दशकांहून अधिक काळ मुंबई महापालिकेत शिवसेना, भाजपची सत्ता आहे. तरीही पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण उडते. युतीने मुंंबईला खड्ड्यात टाकले आहे. इतकेच नव्हे, तर देशसुद्धा यांच्या कारभारामुळे संकटात सापडला आहे. देशाला आणि मुंबईला खऱ्या अर्थाने काँग्रेसची गरज असल्याचे वक्तव्य मुंबई काँग्रेसचे नवनियुक्त कार्याध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी रविवारी केले.एकनाथ गायकवाड यांनी आज रविवारी कार्याध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. या वेळी मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्यासह कृपाशंकर सिंह, चंद्रकांत हंडोरे, वर्षा गायकवाड, नसीम खान आदी नेत्यांसह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
एकनाथ गायकवाड म्हणाले की, सध्याचा काळ काँग्रेससाठी खूप कठीण आहे. या कठीण काळातच आपण सर्वांनी एकजुटीने आणि हिमतीने या संकटाचा मुकाबला करायला हवा. साम, दाम, दंड, भेद आणि प्रलोभनाला बळी पडून काही लोक इतर पक्षांत जात आहेत. अशा परिस्थितीतही अनेक चांगले लोक काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. माझी कार्याध्यक्ष म्हणून घोषणा झाल्यावर मलाही काही लोकांनी फोन करून काँग्रेस पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली. आजपासूनच आपण सर्वांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागायला हवे. त्यानंतर दोन वर्षांतच मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्याच्याही तयारीला लागा, अशी सूचना गायकवाड यांनी या वेळी केली. काँग्रेस माझ्या रक्तात आहे. मी कालही काँग्रेसचा होतो, आजही आणि कायम राहणार आहे. पक्षाने माझ्यावर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून जो विश्वास दाखविला त्याबद्दल मी राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि मिलिंद देवरा यांचे आभार मानतो, असेही गायकवाड म्हणाले.गायकवाडांचे नाव मीच सुचवले - देवराएकनाथ गायकवाड हे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. ते आमदार होते, खासदार होते, मंत्री होते. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांचा अनुभव मुंबई काँग्रेससाठी खूप उपयोगी ठरेल. गटतट सोडून, गटबाजी बाजूला करून संपूर्ण ताकदीने सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. तेव्हाच आपल्याला खूप चांगले यश मिळेल, असेही देवरा म्हणाले.च्लोकसभा निकालानंतर राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला. त्या वेळी मीदेखील मुंबईतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पक्षाने अद्याप माझा राजीनामा मंजूर केलेला नाही.च्मी जेव्हा राजीनामा दिला तेव्हा मुंबईसाठी काय केले पाहिजे, अशी विचारणा झाली. तेव्हा मीच कार्याध्यक्ष निवडण्याची विनंती केली होती आणि एकनाथ गायकवाड यांचे नाव सुचविले होते, असे देवरा म्हणाले.