Join us

माण तालुक्यातील पाणीप्रश्नावर मुंबई व पुणेकर एकवटले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 4:43 AM

सातारा जिल्ह्यातील नेहमीच दुष्काळाच्या छायेत असलेल्या माण तालुक्यातील हस्तनपूर गावातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मुंबईकरांसह पुणेकरही एकवटल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले.

मुंबई : सातारा जिल्ह्यातील नेहमीच दुष्काळाच्या छायेत असलेल्या माण तालुक्यातील हस्तनपूर गावातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मुंबईकरांसह पुणेकरही एकवटल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले. रोजगारानिमित्त गावातून स्थलांतरित झालेल्या मुंबई व पुण्यातील ग्रामस्थांनी नेरूळच्या सेक्टर ६ मधील सरसोळेतील लोकमान्य टिळक समाज मंदिरात बैठक घेत, पाणीप्रश्न सोडविण्यावर विचारमंथन केले. या कामात पाणी फाउंडेशनची मोलाची मदत होत असल्याची माहिती ग्रामस्थ दत्तात्रय मुळीक यांनी दिली.मुळीक म्हणाले, बैठकीमध्ये सर्वसामान्य ग्रामस्थांसह आयकर आयुक्तांपासून वाहतूक अधिकाऱ्यांपर्यंत विविध उच्चपदस्थ अधिकाºयांचा समावेश होता. पाणी फाउंडेशनचे माण तालुका समन्वयक अजित पवार, अनभुलेवडीचे प्रा.संपत इंगळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. महत्त्वाची बाब म्हणजे, ग्रामस्थ सहकुटुंब या बैठकीत सहभागी झाले होते. ग्रामस्थांची अशा प्रकारे बैठक होण्याची ही पहिलीची वेळ होती. तरीही पहिल्याच बैठकीत पुरुषांसह महिला व तरुणांचे प्रमाण जास्त होते.आयकर आयुक्त नितीन वाघमोडे, आरटीओ अधिकारी गजानन ठोंबरे यांच्यासह गावातील सीमा नामदेव किसवे, शोभा संजय खताळ यांनी मनोगत व्यक्त करताना, पाण्याच्या समस्येवर भाष्य करत, श्रमदानासाठी तयारी दर्शविली. त्यांच्यापाठोपाठ सर्व महिलांनी श्रमदान करण्याची तयारी दर्शविली.पाण्यासाठी शिष्यवृत्तीसह नफ्यावर पाणीअभियांत्रिकीत शिकणाºया उत्पल उत्तम खताळ या विद्यार्थ्याने पाणीप्रश्नासाठी स्वत:ची शैक्षणिक शिष्यवृत्ती देणार असल्याचे जाहीर केले. विद्यार्थी असल्याने अद्याप वेतन मिळत नसल्याचे त्याने सांगितले. मात्र, या महत्त्वाच्या कामात खारीचा वाटा उचलता यावा, म्हणून शिष्यवृत्ती स्वरूपात मिळणारी रक्कम पाणी फाउंडेशनला देण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले. व्यवसायाने दुकानदार असलेल्या हेमंत तानाजी किसवे यांनी दुकानाचा दोन महिन्यांचा नफा पाणी फाउंडेशनच्या कामासाठी देण्याचे घोषित केले.

टॅग्स :मुंबई