Join us  

Maharashtra Politics: मुंबईतील पोटनिवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लान! अपक्ष नेत्याला संधी देत शिंदे गटाला धोबीपछाड? 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 4:34 PM

या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून आपल्या पक्षाचा आमदार वाढण्यासाठी भाजप, शिवसेना आणि शिंदे गटाकडून मोर्चेबांधणी केली जात असल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून मोठी बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यानंतर आता शिंदे गट आणि भाजप मिळून राज्यात होमाऱ्या आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार आहे. मात्र, यातच मुंबईतील एका पोटनिवडणुकीसाठीच्या उमेदवारीसाठी आग्रही असणाऱ्या शिंदे गटातून ती जागा हिसकावून घेत, भाजपने तिथे अपक्ष उमेदवाराच्या माध्यमातून निवडणूक जिंकण्यासाठी तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. 

शिवसेना आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी शिंदे गटाने दावा सांगितला होता. मात्र भाजपने ही जागा हिसकावल्याचे बोलले जात आहे. भाजपकडून माजी नगरसेवक मुरजी पटेल यांना रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरु आहेत. मुरजी पटेल यांचे नगरसेवकपद बनावट जात प्रमाणपत्रामुळे रद्द करण्यात आले होते. मात्र, त्यांच्यावर भाजपची भिस्त असल्याचे बोलले जात आहे. 

रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी मिळणार?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप यांची निवडणूकपूर्व युती असल्यामुळे अंधेरी पूर्व मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. विधानसभेला रमेश लटके यांचा १६ हजार ९६४ इतक्या मताधिक्याने विजय झाला. मात्र, मे महिन्यात हृदयविकाराच्या धक्क्याने रमेश लटके यांचे निधन झाले होते. २००९ मध्ये हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर पहिली निवडणूक काँग्रेसने जिंकली होती, तर त्यानंतर दोन वेळा शिवसेनेने आपला भगवा फडकवला. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी गेल्याच आठवड्यात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे ऋतुजा लटके यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आपल्याकडील आमदारांची संख्या वाढवण्यासाठी शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांसाठी ही पोटनिवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. 

दरम्यान, भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. मुरजी पटेल हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत. अंधेरी भागात त्यांनी जीवनज्योत प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले आहे. मुरजी पटेल यांच्या पत्नी केशरबेन २०१२ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर नगरसेविका होत्या. २०१५ मध्ये पटेल दाम्पत्याने काँग्रेस सोडून भाजपचा झेंडा हाती धरला. त्यानंतर २०१७ ची महापालिका निवडणूक जिंकली, मात्र २०१८ मध्ये बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात दोघांचंही नगरसेवक पद रद्द झाले होते.

टॅग्स :राजकारणमुंबईदेवेंद्र फडणवीसएकनाथ शिंदेउद्धव ठाकरे