Join us

अखेर गोखले पुलाची एक मार्गिका प्रवाशांसाठी झाली खुली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 9:58 AM

अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी.

मुंबई : अनेक दिवसांपासून बहुप्रतिक्षित असलेल्या गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या (रोड ओव्हर ब्रीज) एका मार्गिकेचे लोकार्पण सोमवारी मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तींवर मात करत पालिका प्रशासनाने विक्रमी वेळेत १४ महिन्यांत पुलाची उभारणी केली. तसेच रेल्वे प्रशासनासोबत योग्य समन्वय साधताना ही कामगिरी केल्याचे सांगत पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पालिका प्रशासनाचे कौतुक केले.

गोखले पुलाचा पहिला टप्पा सुरू झाल्याने वाहनचालकांना अंधेरी पश्चिम ते पूर्व असा प्रवास करणे शक्य होणार आहे. त्यासोबतच शाळकरी विद्यार्थी, पादचारी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठीही या पुलाचा वापर सोयीचा ठरेल. तसेच वाहनचालकांची वेळ आणि इंधनाची बचतही होणार आहे. 

सद्यस्थितीत गोखले पुलावर पहिल्या टप्प्यात हलक्या वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे, तर प्रकल्पाचे दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतरच अवजड वाहनांना या पुलावर वाहतुकीसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. 

पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर हलक्या वाहनांच्या सोयीसाठी वाहतुकीचे नियोजन हे मुंबई वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. जास्त गर्दीच्या वेळेत तीन मार्गिकांवर वाहतुकीसाठी नियोजन करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

ग्रेड सेपरेटरमुळे प्रवास सलग :

तेली गल्ली येथे ना. सी. फडके मार्ग जंक्शनच्या ठिकाणी ग्रेड सेपरेटरची सुविधा वाहन चालकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ना. सी. फडके मार्ग जंक्शन येथून पश्चिम द्रुतगती मार्गाच्या दिशेने अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येक दोन मार्गिकांच्या फ्लायओव्हर वापराची सुविधा या पर्याय अंतर्गत मिळणार आहे.

टॅग्स :मुंबईमंगलप्रभात लोढादीपक केसरकर