Mumbai: तुमची मुले शाळेत सुरक्षित आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 03:16 PM2023-04-21T15:16:55+5:302023-04-21T15:17:16+5:30

Mumbai: मुंबईत अनेक भागांत शाळांचा परिसर विद्यार्थ्यांसाठी असुरक्षित झाला आहे. रस्ता ओलांडताना विद्यार्थ्यांचे अपघात होतात, चांगले रस्ते नाहीत, पथदिव्यांची बोंब आहे. हे लक्षात घेता प्रत्येक शाळेच्या ५०० मीटरच्या परिघामध्ये विद्यार्थी कितपत सुरक्षित आहेत, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Mumbai: Are your children safe at school? | Mumbai: तुमची मुले शाळेत सुरक्षित आहेत का?

Mumbai: तुमची मुले शाळेत सुरक्षित आहेत का?

googlenewsNext

- सीमा महांगडे
मुंबई :  मुंबईत अनेक भागांत शाळांचा परिसर विद्यार्थ्यांसाठी असुरक्षित झाला आहे. रस्ता ओलांडताना विद्यार्थ्यांचे अपघात होतात, चांगले रस्ते नाहीत, पथदिव्यांची बोंब आहे. हे लक्षात घेता प्रत्येक शाळेच्या ५०० मीटरच्या परिघामध्ये विद्यार्थी कितपत सुरक्षित आहेत, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकूणच महापालिकेच्या शिक्षण विभागाने ‘सुरक्षित शाळा प्रवेश’ या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत कुठल्याही प्रकारचे नियोजन केले नसून विद्यार्थ्यांची सुरक्षितता खुंटीला टांगल्याचे उघड झाले आहे. .  

महापालिकेच्या शिक्षण विभागाने गेल्यावर्षी नगरविकास विभागाच्या सहकार्याने हाती घेतलेला ‘सुरक्षित शाळा प्रवेश’ हा उपक्रम नव्या राज्य सरकारच्या काळात बारगळला आहे.  मुंबईत विद्यार्थीस्नेही आणि चालण्याजोगे स्कूल झोन तयार करणे तसेच रस्ता वापरकर्त्यांसाठी, विशेषतः मुलांसाठी रस्ते चालण्याजोगे, विनाअडथळा, सुरक्षित डिझाइन सोल्यूशन्स या प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्पात राबवणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट होते. मात्र, प्रशासनाला विद्यार्थी सुरक्षिततेपेक्षा सौंदर्यीकरण  महत्त्वाचे वाटत असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. सुरक्षित शाळा या विषयाचे सुतोवाच पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात केले होते. त्याकरिता ५० काेटींची तरतूदही केली होती. 

 ...अशी होती  सेफ झोनची रचना
याआधी राबविलेल्या सेफ झोन प्रकल्पात मुंबई वाहतूक पोलिस, महापालिका, शहरातील रस्ते तज्ज्ञ आणि स्थानिक रहिवाशांनी एकत्र येऊन रंग, बॅरिकेट्स आणि कोन्सचा प्रायोगिक तत्त्वावर वापर केला.
डिझाइन सोल्यूशनमध्ये माहिती फलकांचा वापर करून स्कूल झोन्सची आखणी करणे, रस्त्यांवर खुणा करणे, चालण्यासाठी व वाट पाहण्यासाठी निश्चित भाग नियुक्त करणे, पिक-अप झोन, ड्रॉप झोन निश्चित करणे, खेळण्यासाठी चाइल्ड फ्रेंडली घटकांचा अंतर्भाव करणे आणि पादचाऱ्यांसाठी ठळक क्रॉसिंग आखणे यांचा यामध्ये समावेश आहे. 
 प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्पाविषयी या परिसरातील नागरिकांकडून प्रतिक्रिया घेण्यात येणार होत्या आणि त्यानंतरच हे बदल कायमस्वरूपी करण्यात येणार होते. मात्र, त्यासंदर्भातही अद्याप काहीच कार्यवाही नाही. 

सुरक्षितपणे वावरता यावे
प्रत्येक शाळेच्या ५०० मीटर परिघामध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे वावरता आले पाहिजे. त्यासाठी चांगले पदपथ, पथदिवे, रस्ते, बसथांबे, रस्ता ओलांडण्याची सुविधा इत्यादी सर्व आवश्यक असतात. प्रत्येक विद्यार्थ्याची डेंटल, मेंटल आणि डायबिटीज या तीन आरोग्य पैलूंच्या दृष्टीकोनातून काळजी घेता येईल, असे या उपक्रमाचे स्वरूप होते.

५७% डब्ल्यूआरआय इंडिया सर्वेक्षणात काय आढळले? 
     डब्ल्यूआरआय इंडियाच्या (वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट) सर्वेक्षणात जवळपास ५७ टक्के पालकांनी त्यांच्या मुलांच्या शाळेच्या परिसरातील रस्ते मुलांच्या दृष्टीने सुरक्षित नाहीत, असे सांगितले.
     यासाठी चांगल्या दर्जाचे पदपथ नसणे आणि वाहनांची गर्दी असणे हे घटक कारणीभूत आहेत.

या उपक्रमाला नवीन सरकारने बासनात गुंडाळून ५० कोटींच्या निधीचा ब्युटिफिकेशनच्या नावाखाली चुराडा केला. विद्यार्थीहित  पाहिले पाहिजे. 
- शीतल शेठ - देवरूखकर, माजी सिनेट सदस्या, युवासेना

पालिकेचे म्हणणे काय?
सुरक्षित शाळा प्रवेश हा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा प्रकल्प असून, लवकरच नियोजन विभागामार्फत याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती पालिका अधिकारी देत आहेत. मात्र, त्यासाठी किती वेळ लागेल, याची माहिती ते देऊ शकले नाहीत.

Web Title: Mumbai: Are your children safe at school?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.