मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावरील शीव स्थानकामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एमएसआरसीटीच्या एका कर्मचाऱ्याचा ट्रेनखाली सापडून मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका व्यक्तीसोबत या कर्मचाऱ्याची वादावादी झाली होती. त्यानंतर त्या व्यक्तीने या कर्मचाऱ्या धक्का दिला. त्यामुळे तो तोल जाऊन रेल्वे रुळांवर पडला. तेवढ्यात तिथून येणाऱ्या ट्रेनखाली येऊन त्याचा मृत्यू झाला.
एमएसआरटीसीच्या मृत कर्मचाऱ्याचं नाव दिनेश राठोड (२६) असल्याचं समोर आलं आहे. तर या तरुणाला धक्का देणाऱ्या आरोपीची ओळख अविनाश माने (३१) अशी असून, तो धरावी येथील राहणारा आहे. हा धक्कादायक प्रकार रविवारी घडला असून, या प्रकरणात आरोपीची पत्नी शीतल (३०) हिलाही अटक करण्यात आली.
जीआरपीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, शीव स्थानकावर उतरल्यावर शीतल माने हिचा एमएसआरटीचीच्या कर्मचाऱ्याशी वाद झाला होता. यादरम्यान, काय झालं हे पाहण्यासाठी शीतलचा पती अविनाश माने बाहेर आला. एमएसआरटीसीचा कर्मचारी राठोड हा पत्नीसोबत गैरवर्तन करत असल्याचे त्याने पाहिले. त्यानंतर राठोड आणि माने यांच्यात वाद झाला. प्रकरण हातघाईवर आले. यादरम्यान, माने याने राठोडला एक बुक्का मारला. या धक्क्याने राठोडचा तोल गेला आणि तो रेल्वेच्या रुळांवर पडला. त्याचवेळी तिथून ट्रेन गेल्याने तो ट्रेनखाली सापडला आणि मृत्युमुखी पडला.
पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती आणि स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून धारावी येथून अविनाश माने याला अटक केली. त्यानंतर पोलिसांना त्याची पत्नी शीतल हिलाही ताब्यात घेतले. या दाम्पत्यावर भादंवि कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आता पुढील तपास सुरू आहे.