मुंबई : उष्णतेच्या लाटेने मुंबईला होरपळून काढले असतानाच शुक्रवारी मुंबईकरांना किंचित दिलासा मिळाला आहे. कारण या दिवशी मुंबईत कमाल तापमानाची नोंद ३६.९ अंश एवढी झाली असून, कमाल तापमान किंचित का होईना घटल्याने मुंबईकरांनादेखील दिलासा मिळाला. दरम्यान, १९ ते २० मार्च दरम्यान कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर याच काळात विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. विदर्भात बऱ्याच ठिकाणी उष्णतेची लाट होती. विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.
उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. किमान तापमानाचा विचार करत कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.