Join us  

मुंबईवर हल्ल्याची धमकी, NIA मिळाला ई-मेल; मुंबई पोलीस म्हणाले, आम्ही सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2023 10:18 PM

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अशाच प्रकारचा फोन शहरातील विविध भागात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली होती.

मुंबई - राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) एक अज्ञात ईमेल आला असून त्यात मुंबईवर बॉम्ब हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. तालिबानी असल्याचा दावा करत एकाने मुंबईवर हल्ल्याची धमकी दिली आहे. या ईमेलनंतर सर्व यंत्रणा अलर्टवर आल्या असून NIA नं याबाबत मुंबई पोलिसांना सूचना दिली आहे. महाराष्ट्रात विविध शहरात सुरक्षा वाढवण्यात आली असून ईमेलमध्ये संबंधिताने स्वत:ला तालिबानी म्हटलं आहे. 

धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर सत्य शोधण्यासाठी मुंबई पोलिसांसह एनआयएने संयुक्त तपास सुरू केला आहे. या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीला मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये धमकीचा फोन आला होता ज्यामध्ये एका अज्ञात कॉलरने शाळा उडवून देण्याची धमकी दिली होती. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी ४.३० वाजता शाळेच्या लँडलाईनवर कॉल आला. कॉल करणाऱ्याने शाळेत टाईम बॉम्ब ठेवल्याचा दावा केला होता. 

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अशाच प्रकारचा फोन शहरातील विविध भागात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली होती. मुंबई पोलिसांना एका अनोळखी कॉलरचा 'संशयास्पद' कॉल आला ज्याने त्यांना माहिती दिली की शहरातील अनेक प्रमुख ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कॉलरने दावा केला की, शहरातील इन्फिनिटी मॉल अंधेरी, पीव्हीआर मॉल जुहू आणि सहारा हॉटेल विमानतळावर तीन बॉम्ब ठेवण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी लक्ष्य केलेल्या ठिकाणी सुरक्षा वाढवली आहे. अज्ञात व्यक्तीला पकडलं होतं. 

मुंबईकरांनो, घाबरू नका - पोलीसअशा धमक्या मिळत राहतात. आम्ही नेहमी सतर्क असतो. जेव्हा धमकी मिळतात तेव्हा आम्ही तपास करतो. मुंबईवर कुठल्याही प्रकारचा धोका नाही. मुंबईकरांनी घाबरू नये. आम्ही सक्षम आहोत असा विश्वास मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :मुंबईराष्ट्रीय तपास यंत्रणा