- मनोहर कुंभेजकर
मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयातील शवविच्छेदन कक्षाच्या नावात बदल करून "शव चिकित्सा केंद्र" या नावाने ओळखले जाणार आहे.
दि, २४ जानेवारी २०२२ रोजी प्रभाग क्रमांक २०६चे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी या संदर्भात तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई मनपा आयुक्त इकबाल सिंग चहल आणि तत्कालीन अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना पत्र दिले होते. शवाचे विच्छेदन हा शब्दप्रयोग न करता शव चिकित्सा असा शब्दप्रयोग सर्व मनपा रुग्णालयात करण्यात यावा ही विनंती या पत्रामधे करण्यात आली होती. यानंतर याचा त्यांनी पाठपुरावा केला होता.
यांनतर हा शब्दप्रयोग रुग्णालयात करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांची मंजुरी आवश्यक असते अशी माहिती मिळाल्यानंतर या पत्राच्या अनुषंगाने मुंबई मनपाने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी पत्र व्यवहार केला आणि चर्चा करून सदर उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने महारष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्व महाविद्यालयात/परिसंस्था तसेच रुग्णालयात यापुढे शव विच्छेदन केंद्र असा शब्दप्रयोग न करता "शव चिकित्सा केंद्र" असा शब्द प्रयोग करण्यात यावा असे परिपत्रक काढण्यात आले अशी माहिती सचिन पडवळ यांनी दिली.
याप्रकरणी के ई एम रुग्णालयाच्या डीन डॉ.संगीता रावत तसेच मुंबई मनपा उपायुक्त आरोग्य विभाग संजय कुऱ्हाडे आणि अतिरिक्त प्राध्यापक डॉ.रवींद्र देवकर यांचे विशेष सहकार्य मिळाल्याबद्दल व मुंबई मनपा तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांचे त्यांनी आभार मानले आहेत.