Join us

शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी आणलेले बाळ पळवले, पोलिसांनी ६ तासात शोधले, महिला अटकेत

By गौरी टेंबकर | Published: January 12, 2024 4:27 PM

Mumbai Crime News: कांदिवली पश्चिमच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या २० दिवसांच्या बाळाला पळवून नेण्यात आले. मात्र याची माहिती कांदिवली पोलिसांना मिळताच त्यांनी अवघ्या ६ तासात अपहृत बाळाची सुखरूप सुटका करत अपहरणकर्त्या महिलेचा गाशा गुंडाळला.

- गौरी टेंबकर मुंबई - कांदिवली पश्चिमच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या २० दिवसांच्या बाळाला पळवून नेण्यात आले. मात्र याची माहिती कांदिवली पोलिसांना मिळताच त्यांनी अवघ्या ६ तासात अपहृत बाळाची सुखरूप सुटका करत अपहरणकर्त्या महिलेचा गाशा गुंडाळला.

कांदिवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जानेवारी रोजी  बाळाची आई रिंकी जैस्वाल (२६) त्याला उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात घेऊन आली होती. त्यावेळी तिच्या सोबत तिचा नवरा देखील होता जो केस पेपर काढायला गेला. त्यामुळे रिंकी एकटीच होती ज्याचा फायदा आरोपी महिलेने घेत तिच्याशी गोड बोलून मैत्री केली. तसेच तिला मदत करण्याच्या बहाण्याने तिने बाळाला स्वतःच्या हातात घेत रूग्णालयात फिरायला सुरवात केली. काही वेळाने तू दमली आहेस थोड फ्रेश हो तिने रींकीला सांगितले. रिंकीने तिच्यावर विश्वास ठेवला आणि ती स्वच्छतागृहात गेली.  त्यानंतर आरोपी महिला बाळाला घेऊन पसार झाली.

ही बाब लक्षात आल्यावर बाळाचा पालकांनी कांदिवली पोलिसात धाव घेतली. परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त अजयकुमार बंसल तसेच कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप विश्वासराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोहन कदम, हेमंत गीते आणि पथकाने घटना स्थळीचे सीसीटिव्ही फुटेज पडताळले. तांत्रिक तपास करत पोलीस सदर महिलेपर्यंत पोहोचले. मूल होत नसल्याने तिने ही बाळ चोरी केल्याची कबुली तपास अधिकाऱ्यांकडे दिली.'आम्ही अपहृत बाळासोबत सीसीटीव्हीमध्ये दिसलेल्या महिलेचे वर्णन इतर स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये दिले होते. तेव्हा त्या वर्णनाची महिला बाळ घेऊन आली असून गोरेगावच्या कामा इस्टेट परिसरात तिला ते  सापडल्याचा दावा तिने आधी केला असे विश्वासराव म्हणाले. मात्र त्यानंतर तिने ते बाळ चोरल्याची कबुली दिल्याचे अन्य अधिकाऱ्यानी स्पष्ट केले.

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई