मुंबईत राहणाऱ्या तीरा कामत हिच्या इंजेक्शनचा मार्ग आता मोकळा झाला आहे. तीरा कामत या चिमुकलीला SMA Type 1 हा दुर्धर आजार असल्याचं समोर आलं होतं. तीराला लागणारं इंजेक्शन भारतात तयार केलं जात नाही. त्यासाठी ते अमेरिकेतून भारतात आणणं आवश्यक होतं. या इंजेक्शनचीच किंमत तब्बल १६ कोटी रूपये इतकी होती. तीराच्या आई-वडिलांनी क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून ही रक्कम जमवली होती. परंतु त्यानंतर त्यांच्यासमोर एक मोठा प्रश्न होता तो म्हणजे आयात करण्यात येणाऱ्या इंजेक्शनवर लागणाऱ्या कस्टम ड्युटी आणि जीएसटीच्या रकमेचा. परंतु आता तीराला देण्यात येणाऱ्या इंजेक्शनचा मार्ग मोकळा झाला आहे. तसंच त्यावरील लागणाऱ्या या शुल्कात सूट देण्यासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागानंदेखील सर्टिफिकेट दिलं आहे. "तीराच्या इंजेक्शनवर कस्टम ड्युटी लागू नये यासंदर्भातील एक सर्टिफिकेट आरोग्य विभागाकडून मिळालं आहे. त्यामुळे इंजेक्शनच्या आयातीलवर लागणाऱ्या अतिरिक्त ५ ते ६ कोटी रूपयांच्या शुल्काचा ताण कमी होणार आहे. इंजेक्शन भारतात आणताना आता कस्टम ड्युटी एक्समशन सर्टिफिकेट सादर करावं लागेल. पुढील दोन आठवड्यांमध्ये हे इंजेक्शन भारतात पोहोचणार असून त्यानंतर तीरा नक्कीच बरी होईल," अशी प्रतिक्रिया तीराचे वडिल मिहिर कामत यांनी लोकमत ऑनलाईनशी बोलताना दिली. तसंच तीरासाठी हे सर्टिफिकेट मिळवून देण्यासाठी अभिनेता निलेश दिवेकरनंदेखील मोलाची मदत केल्याचं त्यांनी सांगितलं. निलेश दिवेकरची मोलाची मदततीराच्या जो आजार आहे त्याबद्दलचा एक व्हिडीओ मी पाहिला होता. त्यावेळी तीराला काही मदत करता येईल का विचार डोक्यात आला. त्यामुळे ज्यांनी व्हिडीओ केला होता त्यांच्याकडून मी तीराच्या कुटुंबीयांची माहिती मिळवली आणि त्यांना संपर्क साधला. नुसतं फेसबुकवर किंवा ट्वीट करून काहीच होत नाही. त्यामुळे तीराला मदत करण्यासाठी काही मोठ्या कलाकारांचीही भेट घेतली परंतु त्या ठिकाणी काही झालं नाही. तीराच्या इंजेक्शनसाठी लागणारी कस्टम ड्युटी आणि जीसटीची पाच-सहा कोटी रूपयांची रक्कम कशी मिळवता येईल किंवा माफ करता येईल याचा विचार डोक्यात होता असं निलेश दिवेकरनं लोकमत ऑनलाईनशी बोलताना सांगितलं. "यानंतर हा विषय मी शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांच्या कानावर घातला आणि यासंदर्भात काही मदत होऊ शकेल का याची विचारणाही केली. अनिल देसाई यांनीदेखील या विषयावर लगेच पाऊल उचलत तो मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांच्या कानावर घातला. उद्धव ठाकरे यांनीदेखील लगेच या प्रकरणाची दखल घेत यासंबंधी मदत करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले. यानंतर माझी चर्चा राज्याच्या मुख्य सचिवांशी झाली. त्यांनीदेखील या प्रकरणाचं गांभीर्य ओळखत त्वरित मदत केली," असंही त्यानं सांगितलं. तीराच्या इंजेक्शनसाठी १६ कोटी रुपये जमले; आता हवी मोदी-ठाकरे सरकारची मदत
दोन आठवड्यांत इंजेक्शन येणार
सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रं तीराच्या वडिलांकडून घेऊन मी त्यांच्या कार्यालयात दिली. त्यानंतर आरोग्य विभागाच्या आयुक्तांचीही यासंदर्भात भेट घेतली. मुख्यमंत्री कार्यालयातून यासाठी मला मोठी मदत झाली. आरोग्य विभागाच्या आयुक्तांना भेटल्यानंतर त्यांनी चार फॉर्म दिले. त्यानंतर त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रही तीराच्या वडिलांनी सादर केली. त्यानंतर त्यासाठी आवश्यक होती ती मेडिकल सुप्रिटेंडंट यांची सही. आशिष खोब्रागडे यांनीदेखील या कागदपत्रांवर सही दिली. त्यानंतर ही सर्व कागदपत्र मी आरोग्य विभागाच्या आयुक्तांच्या कार्यालयात सादर केली. या संपूर्ण प्रक्रियेसाठी मला तीराच्या वडिलांकडूनही ऑथॉरिटी मिळणं आवश्यक होते, तीदेखील मिहिर कामत यांनी दिली. आता केंद्राच्या परवानगीचीही गरज नसल्याचं आम्हाला समजलं आहे. ते इंजेक्शन जेव्हा भारतात येईल तेव्हा त्यावर एक स्टिकर असेल. त्याच्या माध्यमातून ही कस्टम ड्युटी माफ केली जाईल. त्यावेळी मिहिर कामत यांना ते सर्टिफिकेट द्यावं लागेल. दोन आठवड्यांमध्ये हे इंजेक्शन भारतात पोहोचण्याची शक्यता असल्याचंही निलेशनं सांगितलं.
क्राऊड फंडिंगमधून जमवले १६ कोटीSMA Type 1 हा आजार तसा दुर्मिळ आहे. भारतात सध्या या आजारावर कोणतंही औषध नाही. परंतु अमेरिकेत या आजारावरचं औषध उपलब्ध आहे. सध्या तीराची प्रकृती पाहता तिला अमेरिकेत नेऊन उपचार करणं शक्य नसल्यानं मिहिर आणि प्रियांका कामत यांनी ते इंजेक्शन भारतात आणण्याचा निर्णय घेतला. परंतु त्या इंजेक्शनसाठी लागणारा खर्च हा फार मोठा होता. या इंजेक्शनसाठी तब्बल १६ कोटी रूपये मोजावे लागणार होते. मिहिर हे एका आयटी कंपनीत काम करतात. तर प्रियांका या फ्रिलांस इलेस्ट्रेटर म्हणून काम करतात. १६ कोटी रूपयांएवढी मोठी रक्कम कशी जमवायची असा प्रश्न दोघांच्या समोर होता. त्याचवेळी त्यांना कॅनडामध्ये मोठ्या आजारांसाठी क्राऊड फंडिंगचा आधार घेतला जात असल्याचं वृत्त दिसलं. त्यामुळे त्यांनीही असेच पैसे उभारण्याचा निर्णय घेत तीरासाठी सर्वकाही करायचा निश्चय घेतला. "उभ्या आयुष्यात आपण कधी १६ कोटी रूपये पाहिले नाहीत. परंतु आता सुरूवात केली पाहिजे असं ठरवलं. एका व्यक्तीला क्राऊड फंडिंगद्वारे पैसे जमा करताना पाहून आपणदेखील असं करू शकतो असा विश्वास निर्माण झाला," असं मिहिर यांनी यापूर्वी सांगितलं होतं.. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर तीराला असलेल्या आजाराविषयी माहिती शेअर केली. तसंच त्यांनी 'फाईट्स एसएमए' असं इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर पेजही तयार केलं. यानंतर त्यांच्याकडे मदतीचा ओघ सुरू झाला आणि त्यांनी या क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून १६ कोटी रूपये जमवले होते.