मुंबई - राज्यातील सकल मराठा समजाच्या आंदोलनावरुन शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. बुधवारी मुंबई बंदच्या पार्श्वभूमीवर सातारा, संभाजीनगर, नवी मुंबईत संतप्त जमावाने पोलिसांच्या गाड्या फुंकल्या. मुंबईत बेस्ट बसेस जाळल्या. हे सर्व घडत असताना मुख्यमंत्री फडणवीस कोठे होते? त्यांच्या सरकारने या काळात पलायन का केले, हे महाराष्ट्राला कळायला हवे, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी सामनाच्या संपादकीयमधून विचारला आहे. म्हणजेच, महाराष्ट्र जळत होता अन् फडणीस सरकार पळत होतं, असा आरोपच उद्धव यांनी केला आहे.
मराठा क्रांती मोर्चाकडून जवळपास 54 मोर्चे हे शांततेच्या मार्गाने काढण्यात आले. मात्र, बुधवारी सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागले. या घटनेतील नुकसानाची जबाबदारीही सर्वस्वी मुख्यमंत्र्यांची असल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. परळीमध्ये आठवडाभरापासून मराठा आंदोलक आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन करत असतानाच मुख्यमंत्र्यांनी चर्चेचे निवेदन काढले असते तर ना महाराष्ट्र पेटला असता, ना काकासाहेब शिंदेंचे बलिदान झाले असते, ना नंतरचा आगडोंब उसळला असता. मराठा समाजास आरक्षण देण्याचा प्रश्न हा भावनात्मक, तितकाच प्रतिष्ठेचा बनल्यामुळे सध्याचे आंदोलन हाताळणे पोलिसांनाही कठीण झाले आहे. आंदोलकांच्या भावना किती तीव्र आहेत हे कालच्या ‘बंद’ प्रकरणात दिसले.
एरवी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमीच 'सब कुछ मै'च्या भूमिकेत असतात. मात्र, मागील चोवीस तासांत ते कोठे होते, काय करत होते, कोणाशी सल्लामसलत करत होते ते माहीत नाही. तसे त्यांनी कालच्या बंदचे, दंगलीचे व पेटलेल्या महाराष्ट्राचे श्रेयदेखील आता घ्यावे, पण मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा. वाटल्यास ‘आम्ही आरक्षण दिले होते’ असा डांगोरा पिटून त्याचेही श्रेय घ्या. पण महाराष्ट्राची आग शांत करा, असे आवाहनच उद्धव ठाकरेंनी सामनातून केले आहे.