मुंबई - आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाल्याचं दिसत आहे. आपल्या मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चानं मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड, अकोला आणि साताऱ्यात बंद पुकारला आहे. मोठ्या संख्येनं मराठा समाज बंदमध्ये सहभागी होत रस्त्यावर उतरला आहे. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले आहे. मुंबई, ठाण्यात तर आंदोलकांनी वाहनांची जाळपोळ, तोडफोड करुन प्रचंड नुकसान केले आहे.
मुंबईतील मानखुर्दमध्येही आंदोलकांनी बेस्ट बसवर दगडफेक करत पेटवून दिली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करुन आग विझवली. मुंबईतील बंदचे पडसाद राज्यभर उमटाताना दिसत आहेत. साताऱ्यात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. तर नवी मुंबईतील कळंबोली येथे पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी (24 जुलै) पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'ला हिंसक वळण लागलं होतं. त्याची दखल घेऊन, आजचा 'मुंबई बंद' शांततापूर्ण मार्गाने करण्याचं आवाहन मराठा क्रांती मोर्चाने केलं असलं तरी, त्यांच्या आचारसंहितेचा भंग होत असल्याचं चित्र मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पाहायला मिळतंय.