Mumbai bandh : राजकीय हेतूने बंद पेटवला; मराठा क्रांती मोर्चाला संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 03:00 PM2018-07-25T15:00:59+5:302018-07-25T15:27:52+5:30
मुंबई आणि आसपासच्या परिसरात शांततेच्या मार्गाने आयोजित करण्यात आलेला बंद काही घटकांनी राजकीय हेतूने पेटवल्याचा संशय मराठा क्रांती मोर्चाच्या मुंबईतील समन्वयकांकडून करण्यात आला आहे.
मुंबई - मुंबई आणि आसपासच्या परिसरात मराठा क्रांती मोर्चातर्फे आज आयोजित करण्यात आलेल्या बंदला काही ठिकाणी हिंसेचे गालबोट लागले. दरम्यान,शांततेच्या मार्गाने आयोजित करण्यात आलेला बंद काही घटकांनी राजकीय हेतूने पेटवल्याचा संशय मराठा क्रांती मोर्चाच्या मुंबईतील समन्वयकांकडून करण्यात आला आहे. तसेच यामागे कोण होते त्याचा शोध घेण्यात येईल, असे मराठा क्रांती मोर्चातर्फे सांगण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईत आयोजित करण्यात आलेला बंद स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा मराठा क्रांती मोर्चाच्या मुंबईतील समन्वयकांकडून करण्यात आली आहे. तसेच मराठा समाजाने शांतता राखावी, असे आवाहन समन्वयकांतर्फे करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा मुंबईकडून आज मुंबई बंदचे आवाहन करण्यात आले होते. मात्र हा बंद शांततेच्या मार्गाने सुरू असतानाच मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई येथे या बंदला गालबोल लावणाऱ्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले आहे. मुंबई, ठाण्यात तर आंदोलकांनी वाहनांची जाळपोळ, तोडफोड करून नुकसान केले.
मुंबईतील मानखुर्दमध्येही आंदोलकांनी बेस्ट बसवर दगडफेक करत पेटवून दिली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करुन आग विझवली. मुंबईतील बंदचे पडसाद राज्यभर उमटाताना दिसत आहेत. साताऱ्यात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. तर नवी मुंबईतील कळंबोली येथे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला.