पक्ष्याला वाचवण्याच्या नादात दोघांनी गमावला जीव; सी लिंकवरील अपघाताचा थरकाप उडवणारा Video
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 10:48 AM2022-06-10T10:48:33+5:302022-06-10T13:45:47+5:30
Mumbai News : मुंबईच्या वांद्रे-वरळी सी लिंकवर एका टॅक्सीने दोघांना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, दोन जण हवेत काही अंतरावर फेकले गेले.
मुंबई - मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंक (Bandra-Worli Sea Link) येथे झालेल्या एका अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या व्यक्तीने उपचारादरम्यान जीव गमावला. पक्ष्याला वाचवण्याच्या नादात दोन जणांनी जीव गमावला आहे. सी लिंकवरील अपघाताचा थरकाप उडवणारा Video समोर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या वांद्रे-वरळी सी लिंकवर एका टॅक्सीने दोघांना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, दोन जण हवेत काही अंतरावर फेकले गेले. यामध्ये अमर मनीष जरीवाला यांचा जागीच मृत्यू झाला. सी लिंकवर एक पक्षी जखमी अवस्थेत पडला होता. याच दरम्यान पक्षीप्रेमी असलेले अमर मनीष जरीवाला यांच्या ते निदर्शनास आले. अमर हे मालाडला काही कामानिमित्त सी लिंकमार्गे जात होते. यावेळी त्यांच्यासोबत श्याम सुंदर कामत हे देखील होते.
Never get down and walk like this on Bandra Worli Sea Link!
— Roads of Mumbai 🇮🇳 (@RoadsOfMumbai) June 10, 2022
NEVER!
pic.twitter.com/YLQGWjcqsE
सी लिंकवर पक्ष्याला जखमी अवस्थेत पाहून अमर यांनी लगेचच श्याम यांनी गाडी थांबवण्यास सांगून ते पक्ष्याला वाचवण्यासाठी धावत गेले. यावेळी श्यामही अमरच्या मदतीसाठी गाडीखाली उतरले. पक्ष्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दोघांचेही मागून येणाऱ्या वाहनांकडे लक्ष नव्हते. इतक्यात एक भरधाव वेगाने जात असलेल्या टॅक्सीने दोघांनीही जोरदार धडक दिली.
जोरदार धडकेत अमर मनीष जरीवाला यांचा जागीच मृत्यू झाला. तर यातील दुसरे जखमी व्यक्ती श्याम सुंदर कामत याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी वरळी पोलिसांनी टॅक्सी चालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.