Join us

नवाब मलिकांविरुद्ध मुुंबई बँकेने केला १००० कोटींचा मानहानी दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2021 7:39 AM

Nawab Malik: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मलिक व अन्य सात जणांवर १००० कोटी रुपयांचा मानहानी दावा ठोकला आहे. या दाव्यावर मलिक यांना सहा आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मलिक व अन्य सात जणांवर १००० कोटी रुपयांचा मानहानी दावा ठोकला आहे. या दाव्यावर मलिक यांना सहा आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

१ ते ४ जुलै दरम्यान बँकेबाबत ‘तथ्यहीन, धक्कादायक आणि बदनामीकारक’ मजकूर असलेले अनेक होर्डिंग्ज मुंबईच्या व्यस्त रस्त्यांवर लावण्यात आले होते. या होर्डिंग्जमुळे बँकेच्या प्रतिमेला धोका निर्माण झाला आहे, असा दावा बँकेने केला आहे. याप्रकरणी मलिक आणि अन्य जणांना नोटीस पाठविली आहे, असेही बँकेने दाव्यात म्हटले आहे. मात्र, मलिक यांनी पोस्टर लावल्याचा दावा फेटाळला आहे. बँकेने दाव्यात उल्लेख केलेल्या ठिकाणी पोस्टर्स लावले नसल्याने जाहीररीत्या माफी मागण्याचा प्रश्नच येत नसल्याचे म्हणत मलिक यांनी बँकेलाच नोटीस मागे घेण्यास सांगितले.

मी किंवा माझ्या पक्षाने (राष्ट्रवादी काँग्रेस) हे होर्डिंग्ज लावले नाही किंवा कोणत्याही प्रकारे त्यात आम्ही सहभागी नाही, असे मलिक यांनी उत्तरात म्हटले आहे. उलट बँकच मलिक यांच्यावर तथ्यहीन आरोप करून त्यांना नाहक वादात ओढू इच्छिते, असे मलिक यांनी म्हटले आहे.

मलिक व अन्य जणांनी बँकेची प्रतिमा मलिन करण्यासाठी निंदनीय आणि बदनामीकारक टिप्पणी केली आहे. जेणेकरून बँकेच्या व्यवसायाचे व कामकाजाचे नुकसान होईल. बँक भ्रष्ट आहे आणि बँकेतील ठेवी सुरक्षित नाहीत, असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न मलिक व अन्य काही जणांनी केला. मलिक व अन्य जणांना बँकेची बिनशर्त माफी मागण्याचे व ज्या ठिकाणी बदनामीकारक होर्डिंग्ज लावण्यात आले होते, त्याच ठिकाणी बँकेवरील आरोप मागे घेतल्याचे होर्डिंग्ज लावण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी बँकेने केली आहे.

टॅग्स :नवाब मलिकमुंबईप्रवीण दरेकर