मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नागपूर येथे विधिमंडळाच्या कामकाजात व्यस्त असतानाही, मुंबईत मजुराचा पगार घेतल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. दुसरीकडे मुंबई सत्र न्यायालयाने याप्रकरणी दरेकर यांना पुन्हा एकदा अटकेपासून दिलासा दिला आहे.मुंबई पोलिसांना अधिक चौकशीसाठी दरेकर यांच्या कोठडीची आवश्यकता आहे. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासाबाबत माहिती दिली. पोलिसांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीत, प्रतिज्ञा मजूर सहकारी संस्था मर्यादित संस्थांच्या केलेल्या तपासणीत, संस्थेचा हजेरीपट तपासला असता त्यामध्ये संस्थेने प्रवीण दरेकर यांना २०१७ मध्ये मजूर म्हणून केलेल्या कामाचे २५ हजार ७५० अशी रोख स्वरूपात देण्यात आले आहे. मात्र हजेरी पत्रकावर दरेकर यांनी सुपरवायझर म्हणून सह्या केलेल्या आहेत. तसेच याच कालावधीत दरेकर हे नागपूर विधिमंडळातील कामकाजात सक्रिय होते. यावरून दरेकर यांनी प्रत्यक्ष अंगमेहनतीच्या मजुरीचे काम केले नाही. सुपरवायझर हे पद संस्थेच्या कर्मचारी संवर्गात येते आणि त्यामुळे त्यांनी संबंधित संस्थेचे मजूर सभासद म्हणून कामकाज केलेले नसून संस्थेचे कर्मचारी म्हणून कामकाज केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी संस्थेकडून रोख रक्कम स्वीकारून संस्थेची फसवणूक केल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे. १९९९ ते डिसेंबर २०२१ पर्यंत बँकेच्या संचालक मंडळावर मजूर प्रवर्गातून निवडून आले. संस्थेचे प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी अध्यक्ष / संचालक असताना बँकेने ४ लाख ७४ हजार ३८५ भत्ते दिले होते. त्यामुळे, यातून जनतेबरोबरच शासनाची फसवणूक करण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. तसेच अन्य आरोपांच्या चौकशीसाठी दरेकर यांची कोठडी गरजेची असल्याचे पोलिसांनी सांगितले. न्यायालयाने बुधवारी पुन्हा निकाल राखीव ठेवून २५ मार्चला निकाल देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आले.
काम केले विधिमंडळाचे पगार घेतला मजुराचा! न्यायालयाने निकाल ठेवला राखून
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 8:50 AM