मुंबई - तौक्ते वादळात नुकसान झालेल्या मच्छिमार बांधवांना अल्पदारात कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी मुंबै बॅंक सकारात्मक रित्या सहकार्य करेल असे आश्वासन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज दिले.
कोळी महासंघ व महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या शिष्टमंडळाने आज विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची आपल्या मागण्यांसाठी भेट घेतली. यावेळी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रसाद लाड, कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व आमदार रमेश पाटील, महाराष्ट्र कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी, कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके, मच्छीमार सोसायटीचे उपाध्यक्ष प्रल्हाद कोळी, सुनील कोळी, कोळी महासंघ व महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती तसेच भाजपा मच्छीमार सेलचे प्रदेशाध्यक्ष ॲड.चेतन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील विविध मच्छिमार संघटनांच्या बहुतांश सदस्यांची बॅंक खाती ही मुंबै बॅंकेत आहेत. त्यामुळे या सदस्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य प्रक्रिया करुन त्यांना मदत करण्यात येईल असेही दरकेर यांनी स्पष्ट केले. यावेळी कृती समितीच्या शिष्टमंडळाने नुकसान भरपाई संदर्भात सविस्तर चर्चा केली. यावेळी मस्यविभागाचे अधिकारी,तसेच मुंबै बॅंकेचे अधिकारी उपस्थित होते.
शेतक-यांना देण्यात येणा-या किसान क्रेडिट कार्डच्या राष्ट्रीय धोरणा प्रमाणे शेतक-यांना त्यांच्या पीक पाणी, बियाणांसाठी बिन तारण कर्ज उपलब्ध होते, त्याप्रमाणे मासेमारी करणा-या मच्छिमारांनाही या धोरणाचा लाभ मिळावा व मच्छिमार बांधावानाही किमान ३ लाख रुपयांचे कर्ज विनातारण उपलब्ध व्हावे यांसदर्भात चर्चा करण्यात आली. हा विषय राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्रीय फिशरी विभागाकडे मांडण्यात येईल असेही दरेकर यांनी सांगितले.
तौक्ते चक्रिवादळात मच्छिमारांच्या बोटींचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामध्ये लहान बोटींसह मोठ्या बोटींचाही समावेश आहे, त्यामुळे या मोठया बोटींना केंद्राच्या पंतप्रधान मत्स्य योजने मार्फत लाभ मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल. व प्रकल्पाची उर्वरित रक्कम मुंबई जिल्हा बॅक उपलब्ध करील. मुंबईत ५१ बोटी पूर्ण निकामी झाल्या आहेत. त्यांना किमान अवश्यक रूपये ६ ते ७ कोटीची व्यवस्था पुनर्वसन करण्या करिता अर्थ सहाय्य जिल्हा बॅक करेल. असे आश्वासनही दरेकर यांनी यावेळी दिले. प्रविण दरेकर यांनी सांगितले की, तौक्ते वादळात मच्छिमारांचे खूप नुकसान झाले असुन मंत्रिमंडळाच्या दि, २७ मे रोजी झालेल्या बैठकीत तौक्ते वादळग्रस्त मच्छिमारांना राज्य सरकारकडुन तुटपुंज आर्थिक मदत जाहीर केली गेली आहे. समुद्र किनारी असलेले १५६ मासेमारी नौका पूर्ण जाळ्या व मासेमारी साधन सामुग्रीसह नष्ट झाल्या आहेत. तर १०२७ नौकांचे कमी जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या मच्छीमारांच्या रु. ५०० ते ४०,००० लाखांच्या मासेमारी नौका पूर्ण निकामी झाल्या आहेत. त्यांना फक्त रुपये २५००० व दुरुस्ती करिता रुपये १०,००० आणि जाळ्या पूर्ण दुरुस्ती करिता रुपये ५००० अशी तुटपुंजी मदत राज्य सरकारने जाहीर केल्याची टिका त्यांनी केली.