मुंबै बँकेत दरेकरांना जोरदार धक्का; बँकेचे अध्यक्ष महाविकास आघाडीकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 07:47 AM2022-01-14T07:47:31+5:302022-01-14T07:47:36+5:30
मुंबई बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक झाली.
मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने ऎनवेळी खेळी करत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना दे धक्का दिला आहे. बँकेच्या अध्यक्षपदी महाविकास आघाडीचे सिद्धार्थ कांबळे विजयी झाले आहेत. तर, उपाध्यक्षपदासाठी समसमान मते पडल्याने ईश्वरी चिठ्ठी टाकण्यात आली, यात भाजपचे विठ्ठल भोसले यांना विजयी घोषित करण्यात आले.
मुंबई बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक झाली. ऎनवेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चेबांधणी करत भाजपच्या ताब्यातील ही बँक स्वतःकडे खेचण्याची खेळी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर आणि युवा सेनेचे सचिव सूरज चव्हाण यांनी दोन्ही पक्षांकडून चक्रे फिरवली. आज सकाळी सह्याद्री अतिथीगृहात संचालक मंडळातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडळींची बैठक झाली.
ईश्वरी चिठ्ठीचा कौल
अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडे देण्याचे ठरले. त्यानुसार राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे आणि शिवसेनेच्या अभिषेक घोसाळकर यांना अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी रिंगण्यात उतरविण्याचा निर्णय झाला. या बैठकीनंतर हे सर्व अकरा संचालक मतदानासाठी सह्याद्री अतिथीगृहातून थेट बँकेत हजर झाले. त्यात सिद्धार्थ कांबळे अध्यक्षपदी निवडून आले. मात्र उपाध्यक्षपदी भाजपचे विठ्ठल भोसले ईश्वरी चिठ्ठीने निवडून आले.