Join us  

मुंबई-बडोदा लढत अनिर्णीत

By admin | Published: October 26, 2015 1:26 AM

बलाढ्य मुंबईने अनिर्णीत राहिलेल्या रणजी सामन्यात यजमान बडोदा विरुद्ध पहिल्या डावात घेतलेल्या ५० धावांच्या नाममात्र आघाडीच्या जोरावर ३ गुणांची कमाई केली

वडोदरा : बलाढ्य मुंबईने अनिर्णीत राहिलेल्या रणजी सामन्यात यजमान बडोदा विरुद्ध पहिल्या डावात घेतलेल्या ५० धावांच्या नाममात्र आघाडीच्या जोरावर ३ गुणांची कमाई केली. यासह मुंबईने ‘ब’ गटात ४ सामन्यांतून १७ गुणांसह आपले अग्रस्थान आणखी मजबूत केले आहे.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केलेल्या मुंबईने, पहिल्या डावात श्रेयश अय्यर (१७३), अभिषेक नायर (८९), अखिल हेरवाडकर (६७) आणि सूर्यकुमार यादव (६८) यांच्या जोरावर ४४७ धावा काढल्या. यानंतर बडोदानेही कडवी झुंज देताना, मुंबईकरांसमोर सहजासहजी हार पत्करली नाही.केदार जाधव (९५), कर्णधार आदित्य वाघमोडे (५७) आणि नवव्या क्रमांकावरील मुर्तुझा वोहरा (५७) यांच्या खेळीमुळे बडोदाने ३९७ धावांची मजल मारली. ९ बाद ३४५ या धावसंख्येवरून चौथ्या दिवसाची सुरुवात केलेल्या बडोद्याकडून वोहरा आणि सागर मंगलोरकर यांनी शेवटच्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी करून मुंबईकरांना सहज वर्चस्वापासून दूर ठेवले. शार्दुल ठाकूरने मंगलोरकरला बाद करून, यजमानांचा डाव संपुष्टात आणला.यानंतर मुंबईला दुसऱ्या डावात झटपट दोन धक्के बसले. मात्र, अखिल हेरवाडकर आणि सूर्यकुमार यादव यांनी १०४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून मुंबईला सावरले. हेरवाडकरने ११६ चेंडूत ८ चौकारांसह ५८ धावांची खेळी केली. यानंतर सुर्यकुमारने मुंबईचा डाव एकहाती सांभाळताना शानदार नाबाद शतक झळकावले. त्याने १४५ चेंडूंमध्ये १२ चौकार व एक षटकार खेचताना १०० धावांची नाबाद खेळी केली. सूर्यकुमारचे शतक झाल्यानंतर दोन्ही संघांनी बरोबरी मान्य करीत सामना अनिर्णीत राखला.