मुंबई : गणपती बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज (मंगळवार) शहर आणि उपनगरात श्रीगणेशाला निरोप दिला जाणार आहे. श्रीगणेशमूर्तींच्या विसर्जनस्थळी दाखल होणा-या भक्तांना महापालिकेकडून आवश्यक सेवा-सुविधा पुरविल्या जाणार आहेत. महापालिकेसह पोलीस आणि उर्वरित यंत्रणा सेवा-सुविधा पुरविण्यासाठी सज्ज झाल्या असून, पालिकेतर्फे याकरिता विसर्जनस्थळांवर साधन-सामग्रीसह नऊ हजार अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात येत आहेत.गिरगाव चौपाटीसह अन्य ६९ विसर्जनस्थळी पूर्वतयारी करण्यात आली आहे. विसर्जनासाठी येणारे वाहन रेतीमध्ये अडकू नये, मूर्तींचे विसर्जन सुरळीतपणे पार पडावे, याकरिता चौपाटीच्या किनाºयावर ८४० जाड लोखंडी फळ्या ठेवण्यात येतात. मात्र या वर्षी अतिरिक्त लोखंडी फळ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. छोट्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी ५० जर्मन तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. ६०७ जीवरक्षकांसह जर्मन तराफे, ८१ बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेश विसर्जनापूर्वी भक्तांनी अर्पण केलेले हार, फुले इत्यादी निर्माल्य जमा करण्यासाठी २०१ निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली आहे. कलशामधील निर्माल्य त्वरित वाहून नेण्यासाठी कॉम्पॅक्टर, मिनी कॉम्पॅक्टर व डंपर अशी १९२ वाहने विसर्जनस्थळांवर ठेवली आहेत.बेस्टद्वारे खांबांवर उंच जागी लावण्यासाठी सुमारे १९९१ दिवे व १३०६ शोधदीप (सर्च लाइट) ची व्यवस्था, नागरिकांच्या सोयीसाठी फिरत्या ११८ शौचालयांची व्यवस्थाही करण्यात आली आहे.६९ नैसर्गिक विसर्जनस्थळे -३२ कृत्रिम तलाव, ६९ नैसर्गिक विसर्जनस्थळे या सेवा-सुविधांमुळे अनंत चतुर्दशीदिनीही कृत्रिम तलावांत जास्तीत जास्त गणेशभक्त गणेशमूर्तींचे विसर्जन करतील, अशी आशा महापालिकेने व्यक्त केली आहे.
मुंबई सेवा-सुविधांनी विसर्जनास सज्ज,९ हजार कर्मचारी-अधिका-यांसह साधन-सामग्रीची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 3:07 AM