Join us

मुंबई : पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना बीडीडी चाळीत घरे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 9:45 AM

जितेंद्र आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील असतील समितीचे सहअध्यक्ष. 

ठळक मुद्देजितेंद्र आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती.गृहमंत्री दिलीप वळसे पाटील असतील समितीचे सहअध्यक्ष.

मुंबई :  पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेले अथवा दिवंगत पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना  मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पात कायमस्वरूपी घरे देण्याच्या दृष्टीने उपाययोजना सूचविण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे समितीचे अध्यक्ष तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे सहअध्यक्ष असतील.

या चाळींमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना दिलेली घरे त्वरित रिकामी करून सेवानिवृत्त व दिवंगत पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना कायमस्वरूपी घरे कशी देता येतील यासाठी ही समिती शासनाला उपाययोजना सुचवेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील वरळी, नायगांव, ना. म. जोशी मार्ग, शिवडी येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास जलद गतीने होण्याच्या दृष्टीने घेतलेल्या आढावा बैठकीत सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी तसेच दिवंगत पोलिसांच्या वारसांना कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केली होती.

समितीत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव, सह पोलीस आयुक्त (प्रशासन) मुंबई, मुख्य अधिकारी, मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ हे या समितीचे सदस्य असतील. म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी समितीचे सदस्य सचिव असतील.

टॅग्स :पोलिसघरमुंबई