- जयंत होवाळ मुंबई - वृक्ष छाटणी आणि संभाव्य अवकाळी पाऊस या दोन बाबी लक्षात घेता मुंबई महापालिकेचे सह आयुक्त आणि निवडणुकीचे नोडल अधिकारी यांनी काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत.
मतदान केंद्रे ही प्रामुख्याने पालिका आणि खाजगी शाळांमध्ये असतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाडे असतात. या ठिकाणच्या झाडांच्या अतिरिक्त वाढलेल्या फांदया मतदानापूर्वी काढाव्यात असे सांगण्यात आले आहे. पालिका शाळांच्या २०० मीटर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्याची सूचना करण्यात आली आहे. मुंबईत काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला होता. त्यामुळे पावसाची शक्यता गृहीत धरता दक्षता देण्यास सांगण्यात आले आहे. पाणी साचू नये, पाण्याचा निचरा वेगाने व्हावा यासाठी यंत्रणा तैनात ठेवावी, विशेष करून मतमोजणी ज्या ठिकाणी होणार आहे, त्या नेस्को , गोरेगाव, विक्रोळी आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट या ठिकाणी खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. मतदान केंद्राच्या आसपास कुठे धोकादायक बांधकाम असल्यास तेथे सूचना देणारा फलक लावावा , असेही सांगण्यात आले आहे.