जुहू सिल्व्हर बीचवर रोज येतो 35 ते 40 डंपर कचरा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 11:40 AM2018-07-25T11:40:58+5:302018-07-25T11:41:55+5:30
पंतप्रधानच्या स्वच्छ भारत अभियानाकडे पालिकेचे दुर्लक्ष
मनोहर कुंभेजकर
मुंबई - पावसाळ्यात समुद्र खवळलेला आहे. पाऊस हा उत्तरेकडून दक्षिणेकडे येत असल्याने समुद्र आपल्या पोटातील कचरा आणि प्लास्टिक मोठ्या प्रमाणात समुद्र किनाऱ्यावर फेकत आहे. मुंबईच्या गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, आकसा व गोराई या सहा समुद्रकिनारी ही कचऱ्याची समस्या आहे. मुंबई महानगर पालिकेने गेल्या 10 ते 12 दिवसांपूर्वी मोठया प्रमाणात या समुद्रकिनाऱ्यांवरून कचरा काढला होता. तर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी चक्क गिरगाव चौपाटी ते मरीन ड्राईव्ह असे अंतर एक तास चालत पालिकेच्या स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली होती. मात्र सध्या समुद्र खवळलेला असल्यामुळे रोज मोठ्या प्रमाणात कचरा मुंबईतील किनाऱ्यांवर येत आहे.
गेली 25 दिवस जुहूच्या सिल्व्हर बीचवर रोज सकाळी 35 ते 40 डंपर कचरा जमा होत असल्यामुळे या बीचला अस्वच्छ स्वरूप आले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशात स्वच्छतेसाठी आग्रही असताना मात्र मुंबई महानगर पालिकेनेच त्यांच्या स्वच्छ भारत अभियानाकडे दुर्लक्ष केल्याची माहिती सी गार्डिंयन संस्थेचे अध्यक्ष सुनील कानोजिया यांनी लोकमतशी बोलताना दिली. गेली 10 वर्षे रोज सकाळी ते बीचवर येतात आणि सोशल मीडियावरून जुहूच्या सिल्व्हर बीचची आजची सद्यस्थिती काय आहे याची सविस्तर माहिती व्हिडिओ आणि फोटोद्वारे थेट पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांना देत असतात. आज खास लोकमतच्या सदर प्रतिनिधीला सकाळी 7.30 वाजता त्यांनी या बीचची विदारक स्थितीची सविस्तर माहिती दिली.
गेल्या आठवड्यात जुहू सिल्व्हर बीचवर आलेल्या ऑइल टार बॉलचे सविस्तर लोकमत ऑनलाईन आणि वृत्तपत्रात दिलेली माहिती खूप उपयुक्त होती आणि लोकमतचे सदर वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले होते अशी माहिती कानोजिया यांनी दिली. सध्या गेली 5 ते 6 दिवस येथे ऑइल टार बॉल येत नाही. मात्र रोज मोठ्या प्रमाणात सकाळी प्लास्टिक व कचरा येत आहे. जुहू चौपटीचे रोज स्वच्छ करण्याचे 6 वर्षांसाठी करोडो रुपयांचे कंत्राट मुंबई महानगर पालिकेने दिले आहे. जुहू सिल्व्हर बीचकडे दुर्लक्ष केले असून येथील बीचची स्वच्छता कंत्राटदार करत नसल्याबद्धल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
जुहू विलेपार्ले बस स्थानकापासून सरळ 10 मिनिटे चालत गेल्यावर सुमारे 1.5 किमीचा जुहू सिल्व्हर बीच लागतो. ब्रिटिशांचा हा आवडता बीच होता. या बीचवर चांदीसारखी शुभ्र वाळूत हा बीच सुर्यकिरणाने चमकत असे. त्यामुळे या बीचचे नाव त्यांनी जुहू सिल्व्हर बीच ठेवले होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी या बीच वर येत असत. तर माजी पंतप्रधान दिवंगत मोरारजी देसाई यांचा बंगला आजही येथे जवळ असून ते या बीचवर येत असत. या बीचच्या स्वच्छतेकडे लक्ष देत असत. जुहू चौपाटीपेक्षा कमी गर्दी या बीचवर असल्यामुळे आज ही अनेक सेलिब्रिटी व मान्यवर या बीचवर सकाळ व संध्याकाळी वॉकसाठी येतात. या बीचच्या प्रवेशद्वाराजवळ अभिनेत्री जीनत अमान राहते अशी माहिती कानोजिया यांनी दिली. तर अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी, शबाना आझमी, माधुरी दीक्षित, उद्योगपती गोदरेज, हिंदुजा, रहेजा यांचे बंगले देखील जुहू सिल्व्हर बीचच्या परिसरात असून त्याचा हा आवडता बीच आहे. या बीचची सध्या कचरा कुंडी झाली असून सेलेब्रिटीसह मॉर्निग वॉकर्सने या बीचकडे आता पाठ फिरवली आहे.
अभिनेता अक्षय कुमार तर आता त्यांच्या बंगल्यातील घरीच असलेल्या जिममध्ये व्यायाम करतो. अभिनेता अक्षय कुमारने या बीचवर येणे बंद केले आहे. मात्र त्याची पत्नी अभिनेत्री ट्विकल खन्ना मात्र या बीचवर वॉकसाठी येतात अशी माहिती सुनील कनोजिया यांनी दिली. 2014 साली पेव्हीट हे मालवाहू मोठे जहाज जुहू सिव्हर बीचवर समोरच समुद्रात अडकले होते. त्यावेळी हे जहाज बघायला सुमारे 8 दिवस रोज 8 ते 10 हजार नागरिक, महिला, तरुण व लहान मुले मोठ्या संख्येने येत होते. या बीचचे महत्व लक्षात घेता राज्य सरकारने पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या बीचकडे लक्ष दिले पाहिजे आणि देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आणि एका राज्याचा अर्थसंकल्प दरवर्षी मांडणाऱ्या मुंबई महानगर पालिकेला नावलौकिक आहे. पालिकेने या बीचची रोज स्वच्छता केली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.