Join us

देशात मुंबई ठरली सर्वात हॉटेस्ट; पारा ३९ वर, हंगामातील आतापर्यंतचे सर्वोच्च तापमान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 6:20 AM

वाढत्या उष्णतेने मुंबईकर बेजार झाले आहेत. उत्तरोत्तर कमाल तापमानात अशीच वाढ नोंदविण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांत सलग दुसऱ्या दिवशी उष्णतेच्या लाटेची नोंद झाली असून, रविवारी मुंबईचे कमाल तापमान तब्बल ३९.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे रविवारी सांताक्रूझ वेधशाळेत हंगामातील आतापर्यंतच्या सर्वोच्च कमाल तापमानाची नोंद झाल्याने देशात मुंबई सर्वात हॉटेस्ट शहर ठरले.  वाढत्या उष्णतेने मुंबईकर बेजार झाले आहेत. उत्तरोत्तर कमाल तापमानात अशीच वाढ नोंदविण्यात येणार आहे.

मुंबईत शनिवारी सांताक्रूझ वेधशाळेत ३८.५ तर कुलाबा वेधशाळेत ३७.४ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली होती. रविवारीही मुंबईत उष्णतेच्या लाटेची नोंद झाली असून, मुंबईचे कमाल तापमान आता चाळीशीच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. रविवारी सकाळी ११ नंतरच मुंबईकरांना उन्हाचे चटके बसू लागले होते. दुपारी १२ दरम्यान सूर्य अक्षरश: आग ओकू लागला आणि मुंबईचे रस्ते तापू लागले. दुपारी १२ ते ४ दरम्यान मुंबईत चटके देणारे ऊन पडले होते. त्यात वाहणारे वारेदेखील उष्ण होते. परिणामी मुंबईकर वाढत्या उष्णतेने हैराण झाल्याचे चित्र होते.

-  मोठ्या बाजारपेठा किंवा गर्दीची ठिकाणे वगळता रविवारी निवासी परिसरातील बहुतांश रस्ते दुपारी १२ ते ४ दरम्यान रिकामे होते. बहुतांशी ठिकाणी तुरळक गर्दी होती. वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी मुंबईकरांनी घरातच राहणे पसंत केले होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :मुंबईउष्माघात