मुंबई - हार्बर मार्गावर लोकलच्या धडकेत मृत्यू झालेल्या एका भिकाऱ्याच्या झोपडीत सापडलेली रक्कम पाहून डोळे चक्रावून जातील. भिकाऱ्याच्या झोपडीमध्ये लाखो रुपयांची नाणी आणि फिक्स डिपॉझिट सर्टिफिकेट असल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल पावणे दोन लाख रुपयांची नाणी, 8 लाख 77 हजार रुपये रुपयांचे फिक्स डिपॉझिट सर्टिफिकेट तसेच बँक खात्यामध्ये 96 हजाराची रक्कम आदी मालमत्ता आढळून आली आहे. भिकाऱ्याच्या झोपडीमध्ये इतकी मोठी मालमत्ता पाहून पोलीस देखील चक्रावून गेले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकलच्या धडकेत एका भिकाऱ्याचा मृत्यू झाला. या भिकाऱ्याच्या अपघाती मृत्यूनंतर त्याची ओळख पटविण्यासाठी पोलीस त्याच्या गोवंडी येथील झोपडीत गेले. त्यावेळी पोलिसांना ही मालमत्ता सापडली आहे. बिरंदीचंद पनारामजी आजाद असं या 75 वर्षीय भिकाऱ्याचं नाव आहे. गोवंडी भागातील झोपडीत तो एकटाच राहत होता. मुळचा राजस्थानचा असून गोवंडी रेल्वे परिसरात भीक मागून जगत होता.
बिरंदीचंद हा गोवंडी मानखुर्द रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळ ओलांडून जात असताना त्याला लोकलची धडक बसली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्याच्या फोटोवरून त्याची ओळख पटवण्यास सुरुवात केली. त्यावेळी तो भीक मागत असून गोवंडी परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याची टाटानगर गोवंडी परिसरातील झोपडी शोधून काढली आणि अधिक तपास केला. त्यावेळी भिकाऱ्याच्या झोपडीत इतकी मोठी मालमत्ता पाहून पोलीस देखील चक्रावून गेले होते.
बिरंदीचंद अनेक वर्षांपासून येथे एकटाच राहत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याच्या झोपडीत त्याबाबत काही माहिती मिळेल का उद्देशाने शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा झोपडीत भीक मागून जमा केलेले तब्बल 1 लाख 75 हजार रुपयांच्या नाण्याने भरलेल्या चार गोण्या सापडल्या. तसेच 8 लाख 77 हजार रुपयांची फिक्स डिपॉजिट सर्टिफिकेट, तसेच त्याच्या बँक खात्यावर 96 हजाराची रक्कम जमा असल्याचे आढळून आले आहे. तसेच पोलिसांना आधारकार्ड, पॅनकार्डसारखी काही कागदपत्रं सापडली त्यावर त्याचे नाव आणि इतर माहिती मिळाली. बिरंदीचंद यांच्या राजस्थान येथील नातेवाईकांसोबत संपर्क साधण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.