‘बेस्ट’चा ‘दस का दम’... फुकट्या प्रवाशांना दणकवले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 09:50 AM2024-01-15T09:50:29+5:302024-01-15T09:51:40+5:30

नववर्षाच्या पहिल्या १० दिवसांत ५.५ लाखांचा दंड वसूल.

Mumbai Best action againest to the people and fine for free paseengers | ‘बेस्ट’चा ‘दस का दम’... फुकट्या प्रवाशांना दणकवले

‘बेस्ट’चा ‘दस का दम’... फुकट्या प्रवाशांना दणकवले

मुंबई : विनातिकीट किंवा अंतरापेक्षा जास्त प्रवास करणाऱ्यांविरोधात बेस्ट परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. नववर्षाच्या पहिल्याच १० दिवसांत ३ हजार ३९१ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून ५ लाख ५३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. या मोहिमेमुळे बेस्ट उपक्रमाच्या उत्पन्नात प्रतिदिन ८ पटींपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

बेस्टच्या बसमध्ये दररोज ३२ ते ३५ लाख नागरिक प्रवास करतात. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने प्रवाशांचा प्रवास आरामदायी, गारेगार व्हावा, यासाठी एसी बसेस प्रवाशांच्या सेवेत आणल्या. या बसच्या तिकिटांचे दर नाममात्र असूनही फुकट प्रवास करणाऱ्यांची ‘बेस्ट सैर’ सुरूच आहे. एसी बसमुळे प्रवाशांची संख्या वाढत असताना दुसऱ्या बाजूला गर्दीतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले. ही बाब लक्षात घेत मुंबईतील गर्दीच्या बस थांब्यांवर अतिरिक्त तिकीट निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
 
३८२ तिकीट निरीक्षकांची नेमणूक :

बेस्ट उपक्रमाने विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवली असून, याकरिता अतिरिक्त तिकीट निरीक्षकांच्या मुंबईतील बस थांब्यांवर नेमणुका केल्या आहेत. सध्या ३८२ निरीक्षक तिकीट तपासणी करत असून फुकट्यांकडून दंड वसूल करत आहेत. 

तारीख    विनातिकीट      दंड
१ जानेवारी    ३४३         ५७,७४७ 
२ जानेवारी    ३४४        ५८,४५७ 
३ जानेवारी    ३४८        ५२,७८८ 
४ जानेवारी    ३७२        ६३,८९२ 
५ जानेवारी    ३५६        ५५,९९० 
६ जानेवारी    ३२०         ५०,९२५ 
७ जानेवारी    २६७        ४६,८५७ 
८ जानेवारी    ३३१         ५३, २०२ 
९ जानेवारी    ३४७        ५६,७४१ 
१० जानेवारी    ३६३       ५६,७१०

विनातिकीट प्रवास टाळा :

स्वस्त, सुरक्षित, आरामदायी व गारेगार प्रवास म्हणून प्रवासी बेस्ट बसला पसंती देतात. साध्या बसचे तिकीट किमान ५ रुपये तर वातानुकूलितचे ६ रुपये तिकीट असल्याने प्रवाशांना स्वस्त तिकिटात आरामदायी प्रवास करता येतो. विनातिकीट प्रवास करणे कायदेशीर गुन्हा आहे. तिकीट काढून आरामदायी प्रवास करावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Mumbai Best action againest to the people and fine for free paseengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.