लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - कोविड काळात आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाचे कंबरडे आणखी मोडले. मात्र पुढच्या वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसभाड्यात वाढ करण्याचा विचार बेस्ट उपक्रमाने तूर्तास झटकला आहे. त्यामुळे सन २०२२ - २३ मध्ये तिकीट भाड्यात वाढ नसलेला दोन हजार २३६.४८ कोटी तुटीचा अर्थसंकल्प बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांना शुक्रवारी सादर केला. वातानुकूलित बसगाड्या वाढवून मुंबईकरांचा प्रवास कूल करण्याचा निर्धार बेस्टने केला आहे.
महापालिकेने तयार केलेल्या कृती आराखड्यानुसार बेस्ट बसभाड्यात जुलै २०१९ पासून मोठी कपात करण्यात आली. त्यामुळे दररोजची प्रवाशी संख्या ३४ लाखांवर पोहोचल्याने उत्पन्नातही हळूहळू वाढ होऊ लागली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्च २०२० पासून संपूर्ण देशात लॉक डाउन जाहीर करण्यात आला. त्याचा मोठा फटका बेस्ट उपक्रमाला बसल्यामुळे तूट वाढत गेली. सन २०२१ -२२ चा अर्थसंकल्प १,८८७.८३ कोटी रुपये तुटीचा होता. यावर्षी परिवहन विभागात २११०.४७ कोटी तर विद्युत विभागात १२६.०१ कोटी तूट दर्शविण्यात आली आहे.
इलेक्ट्रिक, एसी बसगाड्यांची संख्या वाढणार.....
बेस्ट बसगाड्यांमधून दररोज २७ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे येत्या काळात बसगाड्यांची संख्या वाढविण्याची तयारी बेस्टने सुरु केली आहे. पर्यावरणस्नेही भाडेतत्वावरील २१०० इलेक्ट्रिक बसगाड्या समाविष्ट करण्यात येणार आहेत. यामध्ये १४०० एकमजली वातानुकुलीत, ४०० मिडी वातानुकुलीत व १०० मिनी वातानुकुलीत तसेच दोनशे दुमजली इलेक्ट्रिक बसगाड्यांचा चालकासहीत समावेश असणार आहे. मार्च २०२३ पर्यंत बेस्टचा ५० टक्के बसताफा व मार्च २०२७ पर्यंत शंभर टक्के बसताफा हा इलेक्ट्रिक बसगाड्यांचा असणार आहे.
महिलांसाठी विशेष बससेवा....
बेस्टमार्फत महिलांसाठी चालविण्यात येणाऱ्या तेजस्विनी बससेवेच्या धर्तीवर गर्दीच्या मार्गांवर व गर्दीच्या वेळी महिलांसाठी विशेष बस सोडण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. त्याचप्रमाणे विविध कंपन्या, कॉल सेंटर व शाळांकरीता विशेष बससेवा सुरु करुन उत्पन्न वाढविण्याची योजना आहे. मुंबई विमानतळ ते नरिमन पॉईंट व वांद्रे कुर्ला संकुल या ठिकाणी समर्पित बससेवा वातानुकुलीत इलेक्ट्रिक बससेवेद्वारे देण्याची योजना आहे. इलेक्ट्रिक बससेवा शहरात वेगाने पसरविण्याकरीता बेस्ट आपल्या सर्व आगारांमध्ये व बसस्थानकांमध्ये ५५ ठिकाणी पब्लिक चार्जिंग स्टेशन उभारणार आहे.
आकडेवारी कोटीमध्ये
विद्युत पुरवठा विभागउत्पन्न ३५४५.३७खर्च ३६७१.३८तोटा १२६.०१
परिवहन विभागउत्पन्न १४५१.६७खर्च ३५६२.१४तूट २११०.४७
संपूर्ण उपक्रमउत्पन्न ४९९७.०४खर्च ७२३३.५२तूट २२३६.४८