Join us  

भटजी महागले, ऑनलाइन पूजेवर भर, महागाईच्या काळात दक्षिणाही महागली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 1:23 PM

Ganesh Mahotsav Mumbai:

- संताेष आंधळेमुंबई : गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यासाठी आजही घरी ब्राह्मणांना बोलावून शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली जाते. मात्र, काळाच्या ओघात गणपती बसविणाऱ्यांची संख्या वाढली, भटजी कमी पडू लागले. त्यात या महागाईच्या या काळात भटजीची दक्षिणाही वाढली आहे. विशेष म्हणजे या दिवसांकरिता राज्यातील विविध भागातून भटजी मुंबईत येतात.  दरम्यान,  नागरिकांना भटजी आपल्या वेळेनुसार मिळेनात म्हणून  कुणी युट्यूबचा आधार घेऊन, तर कुणी सीडी लावून स्वतःच पूजा करण्याची पद्धत सुरू झाली आहे. कोरोना काळात तर अनेकांनी ऑनलाइन पूजा केली होती.  

काही जण अनेक वर्षांची परंपरा सुरू आहे म्हणून गणपती घरी आणतात, तर काही जण केलेला नवस फेडायचा म्हणून, तर काही हौसेने घरी गणपतीची या काळात प्रतिष्ठापना करतात. मुंबई पालिकेने २०२२च्या आकडेवारीनुसार २ लाख  ३७ हजार ९८५ नागरिक घरी गणपती बसवितात, तर ११ हजार ७८९ सार्वजनिक मंडळे गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करतात. बहुतांश सार्वजनिक मंडळातील गणपती प्रतिष्ठापनेसाठी भटजी येतात.

या दिवशी खूप असते मागणी या एका दिवसात एक भटजी १० ते १२ गणपतींची प्रतिष्ठापना करतात. त्यांना या दिवशी प्रचंड मागणी असते. काही भक्तांना गणपतीची स्थापना करायला दुपार होते. सध्याच्या घडीला घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना करण्यासाठी ७०० रुपयांपासून ते २,१०० रुपये घेतात, त्यामध्ये उत्तर पूजेचा समावेश आहे. सत्यनारायणाच्या पूजेसाठी २,१०० ते ५,००० रुपये घेतले जातात. सार्वजनिक मंडळाच्या गणपतीच्या स्थापनेसाठीची दक्षिणा वेगवेगळी असते. ताडदेवचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्याध्यक्ष सिद्धेश माणगावकर यांनी सांगितले की, आम्ही दहा दिवसांसाठी ३५ हजार रुपये देतो. 

देणारे देतात,  घेणारे घेतात गेली ३० ते ३५ वर्षे मी गणपतीची पूजा करत आहे. २५ रुपये दक्षिणा असल्यापासून मी गणपतीची स्थापना, पूजा करत आहे. आमचे काही नियमित यजमान ठरलेले आहेत. जे वर्षभर आम्हाला बोलवत असतात.  त्यांच्याकडून आम्ही अव्वाच्या - सव्वा दर आकारत नाही. आम्ही ७०० ते १,१०० रुपयांत दोन्ही पूजा करतो. उत्तर पूजा आणि स्थापनेची पूजा करतो. हे मात्र खरे आहे कुणी जास्त दक्षिणा घेत असतील, मी नाकारत नाही. यामध्ये देणारे आहेत म्हणून घेणारे घेतात.- जयवंत भट, भटजी

एक दिवसच मागणी असते  प्रत्येक जण आपल्या सोयी, श्रद्धेनुसार पूजा करतात. कुणी ऑनलाइन करतो, त्याला विरोध नाही. मी एका दिवसात १० ते १२ पूजा करतो. पण, ही मागणी एकाच दिवस असते. वर्षभर आम्ही काय करतोय, कुणीच विचारत नाही. छोट्या, मोठ्या पूजा येत असतात, त्या करतो. आम्हाला काही पेन्शन नाही की दिवाळीचा बोनस नाही. त्यामुळे या दिवसात जे काही मिळते ते आम्ही करत असतो. - सुधाकर भट, भटजी 

आम्हीच करताे पूजा गेली अनेक वर्षे आम्ही घरीच पूजा करत आहोत. आम्हीच बाप्पाची व्यवस्थित शास्त्रोक्त पद्धतीने प्रतिष्ठापना, पूजा करतो. आम्हाला पूजा करण्यात आनंद मिळतो. आम्ही घरी भटजी नाही बोलावत.   श्रुतिका खामकर, गृहिणीभटजी आपल्या वेळेनुसार मिळेनात म्हणून  कुणी युट्यूबचा आधार घेऊन, तर कुणी सीडी लावून स्वतःच पूजा करण्याची पद्धत सुरू झाली आहे.११ हजार ७८९ सार्वजनिक मंडळे गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करतात. २ लाख  ३७ हजार ९८५ नागरिक घरी गणपती बसवितात.

टॅग्स :गणेशोत्सवमुंबई