Join us

उत्तर प्रदेशपाठोपाठ मुंबई भाजपमधूनही राज ठाकरेंविरोधात सूर; अयोध्या दौऱ्याला वाढता विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 5:30 PM

उत्तर प्रदेश भाजप पाठोपाठ मुंबई भाजपमधील पदाधिकाऱ्याचा राज ठाकरेंविरोधात सूर

मुंबई: मनसेप्रमुखराज ठाकरे पुढील महिन्यात अयोध्येच्या दौऱ्यावर जात आहेत. मशिदीवरील भोंग्यांना विरोध करत राज यांनी आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. राज यांच्या भूमिकेचं राज्यातील भाजपच्या नेत्यांनी स्वागत केलं. मात्र राज यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजप खासदारानं विरोध केला आहे. राज यांना अयोध्येत पाऊलही टाकू देणार नाही, असा स्पष्ट इशारा भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी दिला आहे. त्यानंतर आता मुंबई भाजपमधूनही राज यांच्याविरोधात सूर उमटू लागले आहेत.

राज ठाकरेंनी फेरीवाले, टॅक्सीवाले, मजूर यांची माफी मागावी, अशी मागणी मुंबई भाजपचे प्रवक्ते संजय ठाकूर यांनी केली आहे. 'मी इथूनच विरोध करत आहे. मला अयोध्येला जाण्याची गरज नाही. तिथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित आहेत, त्यांचा राज यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध आहे,' असं ठाकूर म्हणाले.

मी घटनात्मक पद्धतीनं विचार मांडत आहे. दृष्कृत्याला दृष्कृत्य करून विरोध करण्याची गरज नाही. मात्र आम्ही राज यांच्यावर निश्चितपणे दबाव आणू शकतो. राज यांनी त्यांची भूमिका मांडण्यासाठी स्वच्छ चारित्र्य घेऊन देशासमोर जायला हवं. त्यामुळे तुमचं हे पाऊल केवळ राजकारणासाठी नसल्याचं स्पष्ट होईल, असं ठाकूर यांनी म्हटलं. 

उत्तर प्रदेशातील खासदाराचा आक्रमक पवित्रामनसेकडून राज यांना हिंदूजननायक अशी उपाधी दिली असताना उत्तर प्रदेशातील भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज यांचा उल्लेख खलनायक असा केला. राज यांच्या कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना मारहाण केली होती, याची आठवण सिंह यांनी करून दिली. राज यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. राज यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे.

टॅग्स :राज ठाकरेमनसेअयोध्याभाजपा