मुंबई : 'नको खोटी भाषा, गुंडाळा शरद पवारांचा गाशा...आपला नातू तुपाशी दुसऱ्यांची पोरं उपाशी...विरोधकांची हुलाहुल, विद्यार्थ्यांची दिशाभूल' अश्या घोषणा देत कंत्राटी नोकर भरतीतून लाखो तरुणांची दिशाभूल केल्याच्या निषेधार्थ मुंबई भाजपच्या वतीने महाविकास आघाडीविरोधात 'नाक घासो' आंदोलन करण्यात आले. कंत्राटी भरतीचा निर्णय हा उद्धव ठाकरे, शरद पवार आणि तत्कालीन कॉंग्रेस सरकारचा असल्याचा आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी यावेळी केला. युवकांची दिशाभूल केल्यामुळे शरद पवार, उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागण्याचीही मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
कंत्राटी भरतीवरुन महाविकास आघाडीने नाक घासून माफी मागावी अशी मागणी करत मुंबई भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. संपूर्ण मुंबईत महाविकास आघाडीविरोधात निषेध मोर्चे काढण्यात येत आहेत.
वांद्रे पश्चिम विधानसभेत मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. घाटकोपरमध्ये खा. मनोज कोटक यांच्या उपस्थितीत आंदोलन करत महाविकास आघाडीचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी आ.मिहीर कोटेचा उपस्थित होते. आ. मनीषा चौधरी यांच्या नेतृत्वात दहिसर येथे निषेध व्यक्त करण्यात आला. आ. पराग अळवणी यांच्या मार्गदर्शनात विलेपार्ले येथे आंदोलन करण्यात आले.आ. अमित साटम यांनी अंधेरीतील लल्लुभाई पार्क येथील भाजपा कार्यालयाच्या बाहेर महाविकास आघाडी सरकारने राबविलेल्या कंत्राटी पोलीस भरती प्रक्रियेचा जाहीर निषेध केला. आ. राम कदम यांनी घाटकोपर येथे आपल्या कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीचा निषेध केला. यासह दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई, गोरेगाव, उत्तर मुंबईत भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन करत महाविकास आघाडीचा तीव्र निषेध केला. यावेळी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.