पालिकेच्या सत्ताधाऱ्यांचे हात मुंबईकरांच्या हत्येत माखलेले; आशिष शेलार यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 07:08 PM2023-03-16T19:08:30+5:302023-03-16T19:08:50+5:30

गेल्या पाच वर्षात मुंबई महापालिकेने ११ लाख ५२ हजार ११५ उंदीर मारले तर ते पूरले कुठे? एवढे उंदीर मारले तर मग हॉस्पिटलमधे रुग्णांचे डोळे, कान उंदराने कसे खाल्ले?

Mumbai BJP president MLA Ashish Shelar make serious accusations that the hands of the municipal authorities are involved in the murder of Mumbaikars | पालिकेच्या सत्ताधाऱ्यांचे हात मुंबईकरांच्या हत्येत माखलेले; आशिष शेलार यांचा गंभीर आरोप

पालिकेच्या सत्ताधाऱ्यांचे हात मुंबईकरांच्या हत्येत माखलेले; आशिष शेलार यांचा गंभीर आरोप

googlenewsNext

मुंबई- गेल्या पाच वर्षात मुंबई महापालिकेने ११ लाख ५२ हजार ११५ उंदीर मारले तर ते पूरले कुठे? एवढे उंदीर मारले तर मग हॉस्पिटलमधे रुग्णांचे डोळे, कान उंदराने कसे खाल्ले? वाघ म्हणवता आणि उंदीर पण खाता का? अशा एकापेक्षा एक प्रश्नांचा भडिमार करत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी महापालिकेतील तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या परिवारवादाला, भ्रष्टाचाराला, घराणेशाहीला मुंबईकर कंटाळले असून त्यांना सुटका हवी आहे. मुंबईत गेल्या पाच वर्षात घडलेल्या दुर्दैवी मृत्यूंना जबाबदार धरत पालिकेच्या सत्ताधाऱ्यांचे हात हत्येत माखलेले आहेत, असा गंभीर आरोप भाजपा आमदार शेलार यांनी केला.

मुंबईच्या विविध प्रश्नांवर आज विधानसभेत  सत्ताधारी पक्षातर्फे नियम २९३ नुसार प्रस्ताव मांडण्यात आला असून आमदार शेलार यांनी हा प्रस्ताव मांडला. यावर बोलताना आमदार आशिष शेलार यांनी गेली २५ वर्षे महापालिकेत सत्ता करणाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. मुंबईकरांच्या माथी गेल्या २५ वर्षांमध्ये तीच घराणेशाही, तोच परिवार त्यांच्या जवळचे कंत्राटदार,  त्यातून निर्माण होणारा भ्रष्टाचार आणि त्यामुळे झालेली दुर्व्यवस्था यांतून मुक्ती मिळावी यासाठी मुंबईकर आवाज उठवत आहेत. मुंबई महानगरपालिकेत असणारं एकाच परिवाराचं सरकार प्रयोगशील कृतिशील विकासात्मक कार्यक्रम हाती घेऊन सर्वसमावेशक कार्य करेल अशी अपेक्षा असताना पदरी निराशाच आली असल्याची मुंबईकरांची व्यथा शेलार यांनी मांडली. सर्व प्रकारचे कर भरूनही त्या बदल्यात घरामध्ये वेळेत शुद्ध पाणी आणि खड्डेमुक्त रस्ते ही मुंबईकरांची माफक मागणीही पूर्ण होत नाही. गेल्या २५ वर्षांत एकाच गावातील त्याच त्याच ब्लॅकलिस्टेड कंत्राटदारांना कंत्राटं देऊन मुंबईचं वाटोळं केल्याचा गंभीर आरोप शेलार यांनी केला.

मुंबईमध्ये उपकर प्राप्त इमारती १७६८१ असून केवळ १३ ते साडे १३%  इमारतींचा विकास झाला. पावसाळ्याच्या काळात दर पावसात एखाद दुसरी इमारत पडते आहे, त्यात लोक प्राण गमावत आहेत. तरीही महानगरपालिकेने त्याबद्दल सर्वंकष विकासाचा एकत्रित विचार करून एकदाही कार्यक्रम हाती घेतला नाही. १९९१ च्या जुन्या विकास आराखड्यातील शहराच्या विकासाच्या धोरणानुसार आरक्षित भूखंडावर मुंबईचा विकास व्हावा अशी अपेक्षा असतानाही गेल्या विकास आराखड्यातील विकास केवळ ३३.६५% असल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून देत शेलार यांनी महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभारावर ताशेरे ओढले. 

मुंबईच्या आरोग्याचा अर्थसंकल्प आणि मुंबईची लोकसंख्या यांची सांगड होते आहे का, याबद्दलही भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी महानगरपालिका प्रशासनावर सवाल उपस्थित केले. १ कोटी ४० लाख लोकसंख्या असलेल्या मुंबई शहराच्या महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे वर्षाचे बजेट ६ हजार ३०९ कोटी रुपये आहे. त्या हिशेबाने ५ वर्षांमध्ये मुंबई महानगरपालिका मुंबईकरांच्या आरोग्यासाठी ३१ हजार ५४७ कोटी रुपये खर्च करत असल्याचे मुंबई महानगरपालिकेचे सांगणे आहे. ५६ लाख मुंबईकरांसाठी हा खर्च होत असून प्रति कुटुंब २ लाख २६ हजार रुपयांचा खर्च होत असूनही इस्पितळांमध्ये औषधे, उपचारांची सामुग्री यांची मात्र वानवाच असते. त्यामुळे हे ३१ हजार ५४७ कोटी रुपये जातात कुठे, असा सवालही शेलार यांनी विचारला. 

उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना त्यांनी कोरोना काळात मुंबईकरांना एकही टेस्ट मोफत केली नाही. मात्र मोठमोठ्या खासगी विकासकांसाठी मुंबई महानगरपालिकेला मिळणाऱ्या कायदेशीर आमदनीचा प्रीमियम ५०% माफ केला आणि त्यामुळे मुंबईकरांच्या १२ हजार कोटी रुपयांवर पाणी सोडले. त्यामुळेच मुंबईमध्ये आज पर्यावरणाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून मुंबईकरांचे प्राण संकटात आले असल्याकडे शेलार यांनी लक्ष वेधले.  सार्वजनिक वाहनव्यवस्थेला गती देण्याची गरज असतानाही मेट्रोच्या कामाला स्थगिती देऊन ठाकरे यांच्या सरकारने मुंबईकरांचा जीव धोक्यात घातल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला.

Web Title: Mumbai BJP president MLA Ashish Shelar make serious accusations that the hands of the municipal authorities are involved in the murder of Mumbaikars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.