महापालिका निवडणुकीपूर्वी मुंबई भाजपची खास मोहीम; जाणून घ्या, काय आहे नवी प्लॅनिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 01:45 PM2022-09-26T13:45:32+5:302022-09-26T13:47:46+5:30
महाविकास आघाडी सरकार कोसळ्यानंतर आता भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांची नजर मुंबई महापालिका काबीज करण्यावर आहे. यासाठी त्यांचे जबरदस्त प्लॅनिंग सुरू आहे.
मुंबई : सध्या मुंबईत महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहताना दिसत आहे. सर्वच पक्ष महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसून तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडी सरकार कोसळ्यानंतर आता भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांची नजर मुंबई महापालिका काबीज करण्यावर आहे. यासाठी त्यांचे जबरदस्त प्लॅनिंग सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून आता भाजपकडून (BJP) 'मंत्री तुमच्या दारी' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
राज्य सरकारने नुकतेच पालकमंत्रीपदाचेही वाटप केले आहे. यात, भाजप नेते तथा पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबईच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ‘पालकमंत्री तुमच्या दारी’ या योजनेत आता स्वतः पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे घरोघरी जाऊन जनतेचे प्रश्न जाणून घेणार आहेत. मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजपचा हा नवा फॅार्म्युला आहे.
पालकमंत्रीपद मिळताच मंगलप्रभात लोढा अॅक्शन मोडमध्ये -
मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून या उपक्रमाची सुरूवात होणार आहे. महत्वाचे म्हणजे पालकमंत्रीपद मिळताच मंगलप्रभात लोढा इन अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. भाजपच्या या मोहिमेंतर्गत मुंबई आणि उपनगरतील सर्व महापालिका वॉर्डांमध्ये जनता दरबार घेण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे, हा जनता दरबार ॲाक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार असल्याचे समजते.
या जनता दरबार कार्यक्रमाच्या माध्यमातून मुंबईकरांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याकडे, महापालिका निवडणूकीच्या तोंडावर थेट जनतेशी जुळवून घेण्याचा भाजपचा फॅार्म्युला म्हणून पाहिले जात आहे.
असं आहे सत्ता समीकरण -
2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत, शिवसेना 93 जागा, भाजप 82 जागा, काँग्रेस 31 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस 9 जागा, सपा 6 जागा, एआयएमआयएम 2 जागा, मनसे 1 जागा, तर अपक्ष 6 जागा, असे समीकरण होते. खरे तर भाजपने गेल्या निवडणुकीत 82 जागा जिंकत शिवसेनेला धक्का दिला होता. यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीत आपली सत्ता राखण्याचे मोठे आव्हान शिवसेनेसमोर असेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.