काँग्रेसविरोधात मुंबई भाजपाची निदर्शने
By admin | Published: August 17, 2015 01:06 AM2015-08-17T01:06:16+5:302015-08-17T01:06:16+5:30
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेसने घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेमुळे जीएसटीसारखी महत्त्वाची विधेयके प्रलंबित राहिली. काँग्रेसने संसदेत घातलेला गोंधळ विकास
मुंबई : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेसने घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेमुळे जीएसटीसारखी महत्त्वाची विधेयके प्रलंबित राहिली. काँग्रेसने संसदेत घातलेला गोंधळ विकास रोखणारा आहे. संसदेचे कामकाज चालू न देणाऱ्या काँग्रेसचा निषेध करीत मुंबई भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दादर येथे जोरदार निदर्शने केली.
ललित मोदी प्रकरणी आक्रमक भूमिका घेत काँग्रेसने संसदेचे कामकाज रोखले होते. काँग्रेसच्या या भूमिकेविरोधात प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करण्याचा निर्णय भाजपाने घेतला. त्यानुसार मुंबईतील शेकडो कार्यकर्त्यांनी दादर रेल्वे स्टेशनबाहेर स्वामी नारायण मंदिरासमोर जोरदार निदशर्ने केली. हातात भाजपाचे झेंडे आणि काँग्रेसच्या निषेधाचे फलक घेऊन शेकडो कार्यकर्ते सकाळी साडे अकराच्या सुमारास या आंदोलनात सहभागी झाले होते. काँग्रेसविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
काँग्रेसने या देशाच्या संसदेचे कामकाज रोखून लोकशाहीचा गळा घोटला आहे. त्यांनी संसदेत गोंधळ घालून जीएसटीसारखे विधेयक मंजूर करू दिले नाही. संसदेचा वेळ वाया घालवला. काँग्रेसची ही देशविरोधी भूमिका घराघरात जाऊन जनतेपर्यंत पोहोचवू, असे मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले.