पावसामुळे मुंबई मंदावली
By admin | Published: July 30, 2016 03:32 AM2016-07-30T03:32:07+5:302016-07-30T03:32:07+5:30
गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी सायंकाळपर्यंत शहर आणि उपनगरात पडलेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांना झोडपून काढले. सायंकाळपर्यंत पडलेल्या पावसाची शहरात ७६.०२, पूर्व उपनगरात
मुंबई : गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी सायंकाळपर्यंत शहर आणि उपनगरात पडलेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांना झोडपून काढले. सायंकाळपर्यंत पडलेल्या पावसाची शहरात ७६.०२, पूर्व उपनगरात ७५.१८ आणि पश्चिम उपनगरात ९८.०५ मिलीमीटर एवढी नोंद झाली. मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असतानाच सखल भागात पाणी साचण्यासह पडझडीच्या घटना घडल्या. तर गोरेगाव येथे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत पराग पावसकर (४५) या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
मागील आठवड्याभरापासून शहर आणि उपनगरात पावसाची रिमझिम सुरू होती. मात्र गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने पकडलेला वेग शुक्रवारी सायंकाळपर्यंत कायम ठेवला. पावसाचा मारा सुरू असतानाच शहरात ९, पूर्व उपनगरात ४ आणि पश्चिम उपनगरात १५ अशा एकूण २८ ठिकाणी पाणी साचले. शहरात १ आणि पूर्व उपनगरात १ अशा २ ठिकाणी घरांच्या भिंतीचा भाग पडला. शहरात ४, पूर्व उपनगरात १ आणि पश्चिम उपनगरात २ अशा एकूण ७ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहरात ७, पश्चिम उपनगरात २ आणि पूर्व उपनगरात १२ अशा एकूण २१ ठिकाणी झाडे पडली. येत्या ४८ तासांत शहर आणि उपनगरात पावसाच्या जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.
वाहतूक वळवली
सायन रोड क्रमांक २४, गांधी मार्केट आणि प्रतीक्षानगर येथील रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे शनिवारी सकाळी येथील वाहतुकीचे मार्ग वळविण्यात आले होते. पावसाचा जोर ओसरल्यानंतर दुपारपर्यंत येथील वाहतूक पूर्ववत झाली. (प्रतिनिधी)
येथे पावसाचा जोर
वरळी, लालबाग, लोअर परेल, दादर, माटुंगा, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई येथे पावसाने जोरदार हजेरी लावली.
परिसरात साचले पाणी
माटुंगा येथील गांधी मार्केट, कुर्ला पश्चिमेकडील शीतल सिग्नल आणि कमानी जंक्शन, कुर्ला पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाचा परिसर, विद्याविहार पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाचा परिसर, एलबीएस मार्गावरील गांधीनगर, अंधेरी सब-वे आणि माहीम.
बुडणाऱ्याला वाचवले
जुहू चौपाटी येथे समुद्रात बुडणाऱ्या फिरोज मोहम्मद शेख (२२) या व्यक्तीला जीवरक्षकांनी सुरक्षितरीत्या बाहेर काढून स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले.